नगर शहरातील करोनाबाधित पहिल्या रुग्णाचे तपासणीचे अहवाल नकारात्मक आले आहे. लवकरच या रुग्णास आणखी एक तपासणीनंतर घरी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आहार, आराम, जीवनसत्त्व युक्त औषधे व समुपदेशन या त्रिसूत्रीमुळे अहवाल नकारात्मक येण्यास मदत झाली आहे. असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नगर शहरात करोना विषाणूची बाधा झालेले तीन रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी पहिल्या रुग्णाच्या स्रावाचे नमुने सातव्या दिवशी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू शोध संशोधन संस्थेत पाठविण्यात आले होते. पण नवे निकष आल्याने चौदा दिवसांनी ते नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. या तीनही रुग्णाच्या सहवासात आलेल्या २५५ जणांना रुग्णालयात विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. त्यांच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २४५ जणांचे अहवाल हे नकारात्मक आले. चौघांचे अहवाल येणे बाकी आहे. तर सहा जणांचे नमुने हे योग्य त्या निकषात बसत नसल्याने नाकारण्यात आले होते. मार्गदर्शक सूचनांनुसार तिघांचे पुन्हा पाठविण्यात आले असून आणखी तिघांचे पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ात ३८७ जणांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याची करोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

राज्यात करोनाचा सहावा रुग्ण सापडला तो नगरचा होता. एका ट्रॅव्हल कंपनीच्या ४० जणांच्या ग्रुपबरोबर या रुग्णाने दुबईहून विमानाने प्रवास केला होता. या रुग्णाला दि. १२ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. १३ रोजी त्याच्या तपासणीचा अहवाल हा सकारात्मक आला. प्रशासनाने करोना रुग्णावर उपचार करण्यासाठी बूथ रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात या रुग्णाला ठेवण्यात आले. सात दिवसांनंतर केलेल्या तपासणीचा अहवाल हा नकारात्मक आला होता. मात्र नव्या निकषाप्रमाणे या रुग्णाचा स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला. तो नकारात्मक आला. आता आणखी एक तपासणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यास घरी सोडण्यात येणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्या पथकाने रुग्णावर उपचार केले. पथकात अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, डॉ. पीयूष मराठे, डॉ. वैजनाथ मुसळे, डॉ. नेवसे यांनी उपचार केले.

आरामाला विशेष महत्त्व

विषाणुजन्य आजारात आरामाला विशेष महत्त्व आहे. रुग्णांना त्याला खूपच चांगला प्रतिसाद दिला. दिवसभर खाटेवर पडून राहिल्याने आराम मिळाला. आता चौदा दिवसांत रुग्णाची प्रतिकारक्षमता वाढली आहे. तसेच रक्त तपासणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यामुळे आता पुढील तपासणी आल्यावर रुग्णास घरी सोडण्यात येईल. असे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.

काय होता आहार?

रुग्णाला घरून डबा आणण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आहारात पातळ पदार्थ म्हणजे डाळीचे पातळ पाणी, लिंबू सरबत, ताक, फळांचा रस, संत्री व द्राक्षाचा रस याला महत्त्व होते. तसेच जेवणात मोड आलेले कडधान्य, भाजीपाला, दही, दूध, तूप ,भात, भाकरी, चपाती याचा समावेश होता. त्याचबरोबर संत्री, द्राक्ष तसेच अन्य फळे देण्यात आली. या आहारामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.