अंजली दमानिया यांच्या उमेदवारीवरून आम आदमी पक्षात धुसफूस सुरूच असून त्यातून येथे नागपूर आम आदमी पार्टी नावाने वेगळीच चूल मंगळवारच्या मुहूर्तावर मांडण्यात आली आहे.  नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे नितीन गडकरी निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसपेक्षाही आम आदमी पक्ष गडकरींविरोधात अधिक सक्रिय असून त्याने पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी अंजली दमानिया यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दमानिया यांच्या उमेदवारीवरून आम आदमी पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रूपाताई कुळकर्णी या सक्षम उमेदवार असताना त्यांची मुलाखत घेऊनही त्यांना उमेदवारी नाकारली. नागपुरात सक्षम कार्यकर्ते नाहीत काय, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते व पक्षाचे प्रमुख समर्थक मोहन कारेमोरे यांनी केला आहे. डॉ. रूपाताई कुळकर्णी यांना उमेदवारी नाकारून नागपुरातील कार्यकर्त्यांवर पक्षाने अविश्वासच दर्शविला असल्याचे कारमोरे यांचे म्हणणे आहे.