21 September 2020

News Flash

आनंदवनातील मतभेदांवर सर्वमान्य तोडगा लवकरच

डॉ. प्रकाश आमटे यांचा विश्वास, विश्वस्त मंडळाची आज वेबबैठक

डॉ. प्रकाश आमटे यांचा विश्वास, विश्वस्त मंडळाची आज वेबबैठक

नागपूर : कुटुंबातील मतभेद दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापतरी त्यात मला यश आलेले नाही. मतभेद मिटेपर्यंत माझे प्रयत्न सुरूच राहणार असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल आणि सर्वमान्य तोडगा निघेल, असा विश्वास प्रसिद्ध समाजसेवक व महारोगी सेवा समितीचे सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, आनंदवनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी समितीच्या विश्वस्त मंडळाची वेब बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वादाच्या निमित्ताने या संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी एका विशिष्ट विचारसरणीचे लोक सक्रिय झाल्याचे लक्षात येताच सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ही संस्था सुरळीत चालणे राज्याच्या हिताचे असल्याने त्यावर प्रशासक नेमण्यासंदर्भात मंत्रालयात चर्चा सुरू झाली आहे.

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आनंदवन आणि हेमलकसा हे प्रकल्प सुरू झाले. बाबांच्या कामावर याआधीही अनेकदा टीका झाली, पण त्यांनी कधीही त्या टीकेचा प्रतिवाद केला नाही वा प्रतिक्रियासुद्धा दिली नाही. प्रतिवाद करण्यापेक्षा आपले कामच बोलले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. तीच शिकवण आम्ही सर्व आमटे कुटुंबीयांनी अंगीकारली आहे. त्यामुळे टीकेकडे लक्ष न देता काम करत राहणे यालाच आम्ही प्राधान्य देतो. संस्थेवर आता संकट आले असले तरी त्यातून आम्ही नक्की बाहेर पडू, असा आशावाद आमटे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कार्यकर्त्यांचा छळ, त्यांच्याबाबतीत केली जाणारी मनमानी, आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून उद्भवलेला आमटे कुटुंबातील कलह, कुष्ठरुग्णांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या अनेक प्रकल्पांना तिलांजली दिली जात आहे, अशा आशयाची वृत्त मालिका ‘लोकसत्ता’ने गेल्या महिन्यात प्रकाशित केली. त्यावर राज्यभरात प्रतिक्रिया उमटली. समाजसेवेचे तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या या प्रकल्पातील वाद मिटावेत यासाठी आता केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ‘आनंदवन’शी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावंतांनी आमटे कुटुंबाशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बाबा आमटे तसेच आनंदवनापासून प्रेरणा घेऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटेंना एक पत्र लिहून हे वाद मिटवावेत, अशी विनंती केली आहे. ‘लोकसत्ता’मधील वृत्त मालिका क्लेशदायक होती, असे नमूद करतानाच ‘आनंदवन’ची सूत्रे आता विकास आणि प्रकाश भाऊंनी हाती घ्यावी. आधी कौस्तुभ, आता डॉ. शीतल यांच्यासह इतर मंडळी जे काम बघत आहेत, त्यांना काही काळ थांबायला सांगावे आणि कार्यकर्त्यांना आश्वस्त करावे. बाबांच्या उद्देशाला समोर ठेवून आजवर जे काम झाले, त्यापासून संस्था तसूभरही बाजूला जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती या कार्यकर्त्यांनी एका पत्रातून केली आहे. पत्रावर डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. अशोक बेलखोडे, माधव बावगे, अनिकेत लोहिया, दगडू लोमटे, धर्मराज हल्लाळे, डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. अविनाश सावजी, डॉ. सविता शेटय़े, मुरलीधर बेलखोडे, प्रा. राम राठोड, व्यंकटेश येरावार, प्रा. राजाराम वट्टमवार, कडगे काका, विनायक पाटील आणि मोहीब काद्री यांची नावे आहेत.

दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासनाला हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नका, असा इशारा दिल्यानंतर तसेच अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतर आता शासनदरबारीही हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून जाणीवपूर्वक हा वाद चिघळवण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांवर सुरू झाला आहे. या वादाचे निमित्त साधून संस्थेवर ताबा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आता लपून राहिलेले नाहीत. यामुळे आनंदवनप्रेमींच्या वर्तुळात आणखी अस्वस्थता पसरली आहे. उल्लेखनीय म्हणजे बाबा आमटे तसेच डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांनी या संस्थेला कधीही कोणत्याही विचारसरणीच्या कह्य़ात जाऊ दिले नाही.

.. तर आनंदवनासमोर उपोषण – शेखर नाईक

गेल्या अनेक वर्षांपासून ‘आनंदवन’शी जोडले गेलेले पुण्यातील नाटय़ आणि सिने दिग्दर्शक शेखर नाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘आनंदवन’मधील वादात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. तेथील ग्रामपंचायतीने एका कार्यकर्त्यांला गावाबाहेर काढण्यासंदर्भात केलेला ठराव बेकायदा आहे. तेथे सुरू असलेल्या वादावर विश्वस्तांनी बाळगलेले मौन आश्चर्यकारक आहे. त्यामुळे ही संस्था टिकवायची असेल तर सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. येत्या १४ ऑगस्टपर्यंत सरकारने पाऊल उचलले नाही तर तेथील कार्यकर्त्यांसह आनंदवनसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नाईक यांनी या पत्रातून दिला आहे.

विस्तारित कुटुंब एकसंध राहणे गरजेचे!

माझ्यासाठी ‘आनंदवन’ हे ‘विस्तारित कुटुंब’ आहे. ज्यात बाबा आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेचे सर्व प्रकल्प आणि तिथले निवासी बांधव आहेत. या मातीत जन्मलेली विविध अभियाने, चळवळी आहेत. आनंदवन प्रवृत्ती भिनलेली देशविदेशातील लाखो माणसे आहेत! असे हे विस्तारित कुटुंब एकसंध राहण्यासाठी व्यापक हिताची भूमिका महारोगी सेवा समितीची विश्वस्त मंडळी घेतील, अशी अपेक्षा आहे.

      – कौस्तुभ आमटे, आनंदवन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 4:16 am

Web Title: differences in anandvan soon get solved say prakash amte zws 70
Next Stories
1 १८ हजार कोटींच्या कर्जातून २८ लाख शेतकरी मुक्त
2 उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता संसर्ग
3 नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांत करोना विषाणूच्या प्रसाराचा मुल्यांकन अभ्यास होणार
Just Now!
X