गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला २६ वर्षीय परशुराम वाघमारे याने तेच पिस्तूल वापरलं होतं जे कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलं. मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आधी झालेल्या कोणत्याही हत्या प्रकरणात वाघमारेचा सहभाग नव्हता असं कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकात समोर आलं आहे.

श्रीराम सेनेशी संबंध असलेल्या वाघमारेला ११ जून रोजी विशेष तपास पथकाने त्याच्या उत्तर कर्नाटकातील विजयपूरा येथील घरातून अटक केली होती. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृतीशी संबंधित असलेल्या चौघांकडून वाघमारेची माहिती मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली होती.

अटक केल्यानंतर वाघमारेने आपण गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या केल्याचं मान्य केलं आहे. यासाठी आपल्याला काहीजणांनी सुपारी दिली होती, सोबतच पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याचंही त्याने सांगितलं आहे. गुरुवारी वाघमारेने तपास पथकाला गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी बेळगावमधील ज्या जंगलात हिंदू जनजागृती समितीचा माजी प्रचारक अमोल काळेने पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं ती जागा दाखवली.

तपास पथकाने काढलेल्या निष्कर्षानुसार, गौरी लंकेश, कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वेगवेगळ्या शुटर्सचा वापर करण्यात आला. मात्र यासाठी दोनच पिस्तूलं वापरण्यात आली. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या शुटर्सनी या चारही हत्या केल्या असाव्यात. प्रत्येक हत्येसाठी वेगळा शूटर वापरण्यात आला असला तरी याचा कट रचण्यात दोन ते तीन जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

 सध्या तपास पथक गौरी लंकेश हत्या प्रकरणातील इतर चार संशयितांचा शोध घेत आहे. वाघमारे याला गौरी लंकेश यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी दुचाकी चालवत आलेली व्यक्ती तसंच निहाल उर्फ दादा यांचा पोलीस शोध घेत आहेत. निहाल उर्फ दादा हा हत्येचा कट रचण्यात सहभागी असल्याचा संशय आहे.