संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ात आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित करताना सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. भाजपमध्ये दोन्ही जिल्ह्य़ांची सूत्रे नागपूरवरून हलवण्यात येतात.

धानाचा कोठार अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्य़ात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. गोंदिया वगळता उर्वरित सर्व सहा जागांवर भाजपचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षात तर गेल्या पाच वर्षांपासून गोंदिया-भंडारा जिल्हय़ातील प्रत्येक निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना नागपुरातील भाजप नेत्यांचे आदेश अंतिम मानण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या अनपेक्षित मताधिक्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान आमदारही पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र विद्यमान आमदारांपैकी किती जण आपली उमेदवारी कायम राखण्यात यशस्वी होतात त्यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. जिल्ह्य़ात बसप आणि वंचित आघाडीचा वाढता प्रभाव काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याची झोप उडवणारा ठरू शकतो.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. पण ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा वेळोवेळी होते. त्यामुळे ते यावेळी काँग्रेसचे उमेदवार असतील की भाजपचे हा प्रश्न आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि गोपाल अग्रवाल यांचे सख्य बघता अग्रवाल शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घेतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडून गेल्या वेळी पराभूत झालेले विनोद अग्रवाल, माजी आमदार रमेश कु थे, डॉ. प्रशांत कटरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, महिला मोर्चा अध्यक्ष भावना कदम यांची नावे चर्चेत आहे. शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. पण भाजप ही जागा सोडणार नाही.

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव मतदारसंघात पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांची ही तिसरी वेळ असल्याकारणांने व मंत्री म्हणून त्यांची कामगिरी विशेष प्रभावी न राहल्याने पक्ष पुन्हा त्यांना उमेदवारी देतो की नवीन चेहरा देतो हे पाहावे लागणार आहे.येथून काँग्रेसकडून रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी तर राष्ट्रवादी कडून मनोहर चंद्रिकापुरे इच्छुक आहेत.

देवरी मतदारसंघात भाजपकडून संजय पुराम तर काँग्रेसकडून सहेषराम कोरेटी व माजी आमदार रामरतनबापू राऊत यांची नावे चर्चेत आहे. तिरोडय़ात भाजपचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड यांनी तयारी सुरू केली आहे.

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या भंडारा-पवनी मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे रामचंद्र अवसरे ३६ हजारांनी विजयी झाले होते. या मतदारसंघातील जातीय समीकरणे निर्णायक ठरतात. या मतदारसंघात ४८ टक्के मतदार ओबीसी आहेत. शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर इच्छुक आहेत. साकोली मतदारसंघातून काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या नावाची तर भाजपकडून आमदार बाळा काशिवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तुमसरमध्ये  विद्यमान आमदार चरण वाघमारे पुन्हा निवडणुकीची तयारी करीत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच अनिल बावणकर इच्छुक आहेत.

मतदारसंघनिहाय जागा

१) गोंदिया- काँग्रेस</p>

२) तिरोडा- भाजप

३) देवरी- भाजप

४) अर्जुनी मोरगाव- भाजप

५) भंडारा- भाजप

६) तुमसर- भाजप

७) साकोली -भाजप