हेमेंद्र पाटील

पावसामुळे पालघरमधील मिरची उत्पादकांना लागवड करण्यात अडचणी; रोपांच्या मुळाला बुरशीची लागण

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाचा मिरची उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. सप्टेंबरमध्ये मिरची पिकाची लागवड करून दिवाळीमध्ये पहिल्या टप्प्यातील मिरची काढून बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी अद्याप लागवड पूर्ण झालेले नाही, तर काही ठिकाणी पावसामुळे मिरचीच्या मुळांना बुरशीची लागण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील कुरगाव, परनाळी, मोगरबाव, वाणगाव, चिंचणी, बावडा, बाडापोखरण आणि एैना या भागांत मिरचीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याठिकाणी उत्पादित केलेली चांगल्या दर्जाची मिरची मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये पाठवली जाते. या भागात पावसाळा संपल्यानंतर साधारणत: सप्टेंबर महिन्यात शेतकरी मिरचीचे रोप लावण्यासाठी सुरुवात करतात. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत मुसळधार पाऊस झाल्याने त्याचा फटका मिरचीला बसला. नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी अद्याप मिरचीच्या लागवडीला सुरुवात करण्यात आलेली नाही. काही शेतकऱ्यांनी पाऊस पुन्हा येणार नाही या आशेने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मिरचीची लागवड केली. मात्र वारंवार पडणाऱ्या पावसामुळे रोपांच्या मुळाजवळ पाणी साचत असल्याने मुळांना बुरशीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. बुरशीपासून रोपांचे संरक्षण व्हावे यासाठी महागडय़ा रासायनिक औषधांचा मोठय़ा प्रमाणात वापर करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना अधिकचा खर्च सोसावा लागत आहे. मिरचीची लागवड करताना साधारणपणे एक महिन्यांचे वाढलेले रोप रोपवाटिकेतून शेतकरी खरेदी करतो. परंतु परतीच्या पावसामुळे लागवडीसाठी आणणाऱ्या रोपांना रोपवाटिकेमध्येच ठेवण्यात आले आहे. लागवडच उशिरा झाल्याने रोपांची उंची रोपवाटिकेमध्येच मोठी झाली असून रोपांना पिशवीतच फुले येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उंचीने मोठी असलेली रोपे लावल्यानंतर त्याचा परिणाम उत्पादनावरही होत आहे.

पावसामुळे मोठा तोटा

दिवाळीच्या दरम्यान मिरचीच्या उत्पादनाला सुरुवात होते. या भागांतून सुरुवातीला साधारण ५० टनच्या जवळपास मिरची विक्रीसाठी पाठवली जाते. किलोमागे शेतकऱ्यांना ४० ते ५० रुपये भाव मिळत असतो. परंतु अजून रोपांची लागवडच झाली नसल्याने प्रत्येक शेतकऱ्याला मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे.