राज्यातील अनेक भागांप्रमाणे सिन्नर तालुकाही दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. पाणी आणि चाऱ्याविना गुरेढोरे तडफडत आहेत. असा मोठा दुष्काळ आपण पाहिला नसल्याचा सूर अलीकडील पिढी व्यक्त करत असली, तरी तालुका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे त्यांच्या समर्थकांना या दुष्काळापेक्षाही कितीतरी मोठे वाटतात. त्यामुळेच तर शनिवारी त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात प्रसिद्ध गायक सुदेश भोसलेने एक रुपयाही न घेता कार्यक्रम करण्याची तयारी दर्शविणे, दिघोळेंच्या प्रेमापोटी एकाने व्यासपीठ व मंडप सजावटीची सेवा विनामूल्य करण्यास सहमती दर्शविणे, असे सारे कसे जमून आले. अर्थात पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असलेला सुहास कांदे हा अभीष्टचिंतन सोहळा समितीचा अध्यक्ष असल्यावर हे सर्व जमून येत असेल तर त्यात नवल ते काय, असाच सूर सर्वत्र व्यक्त होत आहे.
दिघोळे यांच्यासारख्या सभ्य व नेमस्त नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत दिघोळेंच्या नेमकी उलट प्रतिमा असलेला सुहास कांदे पुढे आल्यावर उपस्थित सर्वच काही क्षण चरकले. अखेर दिघोळेंना कांदेची गरज का भासावी, कांदेसारख्या व्यक्तीला जवळ करण्यापेक्षा त्यांनी राजकारण व सार्वजनिक जीवनातूनच संन्यास का घेतला नाही, यांसारखे अनेक प्रश्न दिघोळेंविषयी सहानुभूती असणाऱ्यांच्या मनात फेर धरून आहेत. दिघोळेंच्या प्रतिमेचा लाभ उठवीत कांदे स्वत:ला पावन करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याची प्रतिक्रियाही उमटत आहे.
तडीपारीची कारवाई ओढवलेला आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेत तपासातील त्रुटींचा फायदा घेत सुटका करून घेतलेला कांदे हा भैरवनाथ पतसंस्थेचा अध्यक्षही आहे. ही पतसंस्था दिघोळेंशी संबंधित आहे हे विशेष. थकबाकीमुळे डबघाईस आलेल्या या पतसंस्थेचे अध्यक्षपद साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी हाती येताच कांदेच्या ‘अतीविनम्र’ आणि कार्यकर्त्यांच्या ‘अतीप्रेमळ’ समजाविण्याच्या पद्धतीने थकबाकीदारांनी दुष्काळाची पर्वा न करता घरातील भांडीकुंडी, जमीन विकून आधी थकबाकी भरणे आपल्या कुटुंबासाठी हितावह समजले. तालुक्यातील ‘सामाजिक’ कार्याची अशी दणक्यात सुरुवात केल्यावर कांदे आता दिघोळेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘समाजसेवक’ अशी आपली प्रतिमा निर्माण करू पाहात आहे. त्यासाठी हार-तुऱ्यांचा खर्च दुष्काळ निवारणासाठी, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कांदेने ‘देवाज् ग्रुप’च्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आपल्या ‘अलौकिक’ कार्यास सुरुवात केली. त्याच्या या अनोख्या कार्याची दखल प्रथम मनसेने घेतली. त्यास थेट जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. दरम्यानच्या काळात नाशिकच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी कांदेवर तडीपारीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा खुद्द राज ठाकरे यांनी राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा दावा केला होता. परंतु कांदेमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे लक्षात आल्यावर मनसेने त्याची हकालपट्टी केली. पोलिसी कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी मग त्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा घेतला. या पक्षाचे प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या ठाण्यातील एका बोलघेवडय़ा नेत्याने कांदेला तेव्हा पाठीशी घातले. नांदगाव मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवाराचा त्याने प्रचार केला. भुजबळ यांच्याशी जवळीक साधण्याचा त्याचा प्रयत्न तेव्हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यानच्या काळात सिडकोत ३५ ते ४० वाहने रात्रीतून पेटवून देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित म्हणून कांदेचे नाव पुढे आले. नंतर या गुन्ह्यातून त्याची मुक्तता झाली, परंतु अजूनही त्याच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत. वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी आपणास धमकाविले जात असल्याची सर्वच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तक्रार केली होती.
असा हा कांदे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची अवस्था ‘आपलेच दात अन् आपलेच ओठ’ अशी झाली असताना विरोधकांमध्येही अस्वस्थता आहे.