अनेक लोककला आणि बोलीभाषा काळाच्या ओघात लुप्त होतात. नव्या पिढीला संशोधन किंवा अभ्यासासाठी त्या उपलब्ध होत नाहीत. महाराष्ट्राला कला-संस्कृती आणि बोलीभाषांचा मोठा ठेवा लाभला आहे. हा सांस्कृतिक ठेवा पुढे नेणे आवश्यक असून त्यासाठी शासनातर्फे लोककला आणि बोलीभाषांचे ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रविवारी येथे आयोजित सोहळ्यात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण पंडित जसराज यांच्या हस्ते, तर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंडित जसराज यांच्या हस्ते डॉ. अत्रे यांना पुरस्कार प्रदान झाल्याने संगीतप्रेमींना आनंद झाल्याचे नमूद करत तावडे म्हणाले, शासनातर्फे कलेला राजाश्रय देण्यात येत असताना त्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते अशा स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करण्यात यावे, अशी शासनाची भूमिका आहे. ज्येष्ठ व्यक्तींकडून पुढील पिढीला कलेची प्रेरणा मिळणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे कलेच्या व्यासपीठावर कलाकारांचा सन्मान व्हावा असे प्रयत्न यापुढेही केले जातील असे आश्वासन दिले.
पंडित जसराज यांनी प्रभाताईंचे गाणे म्हणजे ईश्वराचे देणे असून संगीत क्षेत्रात त्यांचे कार्य अतिशय मोठे असल्याचे सांगितले. प्रभाताईंच्या स्वरांनी संगीतातील प्रत्येक रसाला स्पर्श केला आहे. रागानुरूप वातावरण निर्मिती करण्याची क्षमता त्यांच्या स्वरात आहे. गेली कित्येक वर्षे त्यांचे गायन ऐकण्याचा आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शासन शास्त्रीय संगीत क्षेत्राला पुढे नेण्यासाठी चांगले प्रयत्न करीत आहे. यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. शासनाच्या प्रयत्नांमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात संगीत क्षेत्रासाठी अधिक अनुकूल वातावरण असल्याचे पं. जसराज यांनी सांगितले. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रभा अत्रे यांनी संगीताने जगण्याला अर्थ दिल्याचे नमूद केले. आयुष्याच्या या टप्प्यावर एकटी नसून सुरांनी जोडलेली नाती कायम आहेत. हा पुरस्कार आपला नसून शास्त्रीय संगीतातील साधनेचा, श्रोते व आई-वडील आणि गुरूंचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
काळानुसार कलाविष्कार बदलत जातो. कलेबरोबर शास्त्रानेही बदलणे तेवढेच आवश्यक आहे. आजच्या संगीतात राग, ताल अधिक विकसित स्वरूपात समोर येत आहेत.      त्यामुळे आजच्या कलाविष्कारांना सामावून घेणारे शास्त्र निर्माण करणे ही काळाची गरज आहे. मात्र, असे बदल करताना शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताच्या मूळ स्रोतापासून दूर जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.