यापुढेही खेळाडू दत्तक योजना सुरू ठेवण्याची ग्वाही
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतच्या यशामुळे प्रभावित होऊन जिल्ह्याच्या गरजू युवा खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी २०१०मध्ये ‘दत्तक खेळाडू’ योजनेच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने यापुढेही गुणवंत अ‍ॅथलीट्सच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात नुकत्यात झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश मिळविणाऱ्या नाशिकच्या खेळाडूंना गुरुवारी येथे महिंद्रा क्लब हाऊसमध्ये गौरविण्यात आले.
२०१०मध्ये महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने १२ युवा खेळाडूंना दोन वर्षांसाठी दत्तक घेतले होते. वर्षांतून दोन वेळा क्रीडा साहित्याचा संच, योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी, शिक्षण, विविध स्पर्धाच्या ठिकाणी जा-ये करण्याचा खर्च महिंद्राच्या या योजनेत सामील होता. भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर ‘साई’चे प्रशिक्षण केंद्र चालविणारे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत महिंद्राने केलेली मदत वाया जाणार नाही याची दक्षता मोनिका आथरे, अंजना ठमके, दुर्गा देवरे, संजीवनी जाधव, किसन तडवी, दत्ता बोरसे, सुरेश वाघ, कांतिलाल कुंभार, गोविंद रॉय, कोजागिरी बच्छाव, हरिश चव्हाण, रिशु सिंग या सर्व खेळाडूंनी घेतली. कठोर परिश्रम करून दोन वर्षांत निर्माण झालेल्या १४ राष्ट्रीय विक्रमांमध्ये या खेळाडूंचा सहभाग आहे. ठाणे व मुंबई मॅरेथॉनमधील कामगिरीमुळे संपूर्ण राष्ट्राला मोनिका आथरेचे नाव माहीत झाले. याशिवाय उत्तर प्रदेशातील इटावा येथे जानेवारी २०१३मध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत इतर खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली.
 ‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमकेने १६ वर्षांआतील गटात ४०० व ८०० मीटरमध्ये, दुर्गा देवरेने १४ वर्षांआतील गटात ६०० मीटरमध्ये तर किसन तडवीने १६ वर्षांआतील गटात तीन हजार मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदविले. आशियाई शालेय ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड स्पर्धेसाठी नाशिकचे सात खेळाडू पात्र ठरण्याची  शक्यता आहे.
या खेळाडूंच्या कामगिरीमुळे यापुढेही महिंद्राच्या वतीने त्यांना सर्व प्रकारची मदत देण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी या वेळी दिली. प्रशिक्षक सिंग यांनी या वेळी शहरातील डॉक्टर वर्गाकडून खेळाडूंना सदैव मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. कंपनीचे इतर पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.