News Flash

सोपल यांच्या निर्णयाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला फटका

भाजपने अशा पध्दतीने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भरती सुरू केल्यानंतर आता ही भरतीची मालिका शिवसेनेनेही हाती घेतली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर

सोलापूर जिल्ह्य़ात  राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी जणू स्पर्धा सुरू झाल्यासारखे चित्र दिसून येते. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ बाजूला ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने व आमदार दिलीप सोपल हे दोघेही येत्या बुधवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. गेल्या आठवडय़ात करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्या रश्मी बागल यांनी सेनेत प्रवेश केला होता.

त्यानंतर सध्या ‘तळ्यात-मळ्यात’ असलेले माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्याही राजकीय निर्णयाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच खरे तर सोलापूर जिल्ह्य़ात राजकीय समीकरणे बदलत आहेत. माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देताना अडविण्यात आल्याने अखेर मोहिते-पाटील कुटुंबीयांनी पक्षाशी फारकत घेऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला. पंढरपूरचे नेते सुधाकर परिचारक, त्यांचे पुतणे तथा विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्यासह पंढरपुरातील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील आदी मंडळींनीही भाजपचा रस्ता धरला होता. भाजपने अशा पध्दतीने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भरती सुरू केल्यानंतर आता ही भरतीची मालिका शिवसेनेनेही हाती घेतली आहे.

स्थानिक समीकरणे बदलणार

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती होणार की होणार नाही, याची पर्वा न करता मतदारसंघात आपापले अस्तित्व राखण्याच्या इराद्याने ‘आयारामां’ची खटपट सुरू असल्याचे मानले जाते. या पक्षांतरामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. बार्शी हे त्याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल. आमदार दिलीप गंगाधर सोपल हे आतापर्यंत राष्ट्रवादीचे निष्ठावंत आमदार समजले जात होते. १९८५ साली ते प्रथमच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून गेले होते. पुढे सातत्याने निवडून येत असताना १९९५ साली अचानकपणे त्यांना डावलण्यात आले तेव्हा बंडखोरी करून त्यांना निवडून यावे लागले. त्या वेळी राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर अपक्षांचे नेते म्हणून सोपल यांनी युतीला पाठिंबा दिला होता. त्या काळात त्यांनी काही दिवस मंत्रिपदही सांभाळले होते. नंतर पुन्हा १९९९ साली ते राष्ट्रवादीकडून आमदार झाले. पुढे २००४ साली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे तत्कालीन तरूण उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोपल यांना प्रथमच पराभूत केले होते. राऊत हे तसे सोपलांचे पारंपरिक विरोधक. दरम्यान, २००४ नंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राऊत यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, तेव्हा काँग्रेसकडून उभे राहिलेले राऊत यांना पराभूत करण्यासाठी सोपल यांना अपक्ष म्हणून लढावे लागले व त्यात ते यशस्वी झाले. आघाडी शासनाच्या काळात सोपल यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली होती. बार्शीचे राजकारण सोपल व राऊत यांच्या भोवतीच फिरत असताना काळाची पावले ओळखून राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेत परतून ‘घरवापसी’ केली खरी; परंतु नंतर अलीकडे पाच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन भाजपचा प्रभाव वाढला असता राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट संपर्कात येऊन शिवसेनेतून भाजपमध्ये कोलांटउडी मारली. या पाश्र्वभूमीवर आमदार सोपल यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राऊत यांनी देखील सोपल यांचे आव्हान स्वीकारून विधानसभेच्या लढतीत त्यांना अस्मान दाखविण्याचा विडा उचलला आहे.

इतर नेत्यांचे काय?

पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके व अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांचा राजकीय निर्णयाचा मुहूर्त येत्या ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सोलापुरात होणाऱ्या समारोपप्रसंगी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात म्हेत्रे व भालके हे दोघेही मौन पाळून आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांची साथ सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार  असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. आमदार शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप प्रवेशाची संधी होती. तसा प्रस्तावही आला होता. परंतु दोघा शिंदे बंधूंना पवारनिष्ठा आडवी आली. संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून अध्यक्षपद मिळविले होते. भाजप प्रवेशाच्या मुद्यावर मात्र ते मुख्यमंत्र्यांना सतत झुलवत राहिले. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीत परतणे पसंत केले. ही आपली राजकीय चूक ठरल्याचे ते आज कबूल करतात. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या मोहिते-पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत  यांनी शिंदे बंधूंना अनुक्रमे भाजप व शिवसेनेत प्रवेश देण्यास जोरदार विरोध दर्शविला आहे. इकडे राष्ट्रवादीपासूनही शिंदे बंधू दूर गेले आहेत, त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी त्यांची अवस्था झाल्याचे पाहावयास मिळते. सोलापुरात एकंदरीत, राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला आता पार उद्ध्वस्त झाल्यात जमा असल्याचे मानले जाते.

बार्शीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनी बार्शीतील आपल्या निवासस्थानी समर्थकांच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे अखेर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. या वेळी सोपल समर्थकांनी सेना प्रवेशाच्या निर्णयाचे स्वागत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:10 am

Web Title: dilip sopal decision hits ncp in solapur abn 97
Next Stories
1 विलास तरे यांच्या सेना प्रवेशाने निष्ठावंत नाराज
2 भंडारा-गोंदियात उमेदवारी निश्चित करताना कस
3 राष्ट्रवादीच्या यात्रेकडे राणा जगजितसिंह यांची पाठ
Just Now!
X