परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजय भांबळे व शिवसेनेचे संजय जाधव या दोघांच्या सरळ लढतीत प्रमुख राजकीय पक्षाचा तिसरा उमेदवार दाखल होईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात ती शक्यता संपुष्टात आली आहे. मनसेचे रेल्वे इंजिन या निवडणुकीत धावणार नाही. त्याचबरोबर ‘एमआयएम’चा उमेदवारही मैदानात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
परभणी मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवाराचा शोध गेले अनेक दिवस सुरू होता. मात्र, मनसेला योग्य उमेदवार मिळाला नाही. मनसेने अनेकांना गळ घालून पाहिली. पण प्रतिसाद लाभला नाही. डॉ. श्रीराम मसलेकर, अॅड. प्रताप बांगर यांनाही विचारणा झाली. मात्र, हे दोघेही तयार झाले नाहीत. जेथे जेथे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत, तेथे तेथे उमेदवार उभे करण्याचे मनसेचे धोरण उघड झाल्यानंतर परभणीत मनसेचा उमेदवार जाहीर होईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात मनसेकडून उमेदवारी जाहीर झालीच नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना मनसे नेतृत्वाने उमेदवाराचा शोध घेण्यास सांगितले होते, पण त्याला यश आले नाही. मनसेचे बालाजी मुंढे, विनोद दुधगावकर, बालाजी देसाई या तिघांचीही लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पक्षाने चाचपणी केली. मात्र, तिघांनाही लोकसभेपेक्षा विधानसभेतच रस असल्याने जवळची रसद आताच कशाला संपवून टाका, असा विचार यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकेवर रेल्वेचे इंजिन असावे, अशी पक्षनेतृत्वाचीही इच्छा होती, पण ती फळाला आली नाही. शिवसेनेच्या मतविभागणीसाठी मनसेचा उमेदवार आपल्याला लाभदायी ठरेल, असे राष्ट्रवादीला वाटत होते. तसेही घडले नाही. मात्र, जसे राष्ट्रवादीच्या मनासारखे झाले नाही, तसेच शिवसेनेच्याही मनासारखे झाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या परंपरागत मतदानाला सुरुंग लावणारा उमेदवार शिवसेनेला हवा होता. विशेषत: मुस्लीम मतदारांची विभागणी करण्यासाठी एमआयएमच्या ज्या उमेदवारावर शिवसेनेची भिस्त होती, तो एमआयएमचा उमेदवार िरगणात असावा, या दृष्टीने शिवसेनेचे प्रयत्नही चालले होते. तथापि शिवसेनेचा हिरमोड झाला. मनसे व एमआयएम या दोन्ही पक्षांचे उमेदवार िरगणात नसल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेची मतविभागणी टळणार आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांत सरळ लढत होणार, हे उघड आहे.
िरगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांपकी भाकपचे राजन क्षीरसागर हे डाव्या चळवळीशी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात संघर्षशील आहेत. क्षीरसागर यांचा आधार हा श्रमिक वर्गात आहे. त्यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता नाही. त्यांची मते चळवळ व श्रमिक वर्गातल्या जनतेशी संबंधित आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला व शिवसेनेला आता थेट एकमेकांच्या विरुद्ध लढावे लागणार आहे. निवडणुकीत निर्णायक ठरणारी जाती-पातींची गणिते बदलून टाकणारा उमेदवार या निवडणुकीत दिसत नसल्याने भांबळे व जाधव यांच्यातच सामना रंगणार आहे.