16 December 2017

News Flash

शिवाजी महाराजांचे विकास धोरण दिशा देणारे!

छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण व विकास धोरण आजच्या राज्यकर्त्यांना दिशा देणारे आहे, पण इतिहासाच्या

वार्ताहर, सावंतवाडी | Updated: January 28, 2013 3:08 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण व विकास धोरण आजच्या राज्यकर्त्यांना दिशा देणारे आहे, पण इतिहासाच्या घटनांकडे दुर्लक्ष करून धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत ढिसाळपणा जाणवत आहे. इतिहासाच्या घटनांची दखल वेळीच घेतली नाही तर तशा घटना वारंवार घडू शकतात, असा इशारा नौदलप्रमुख (निवृत्त) अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांनी दिला.
विजयदुर्ग किल्ल्यावर शिवभारतकार कवींद्र परमानंद साहित्यनगरीत गोनिदा तिसरे दुर्ग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून आवटी बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन शिवदुर्ग साहित्यिक अण्णा शिरगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पुढाकाराने गोनिदा तिसरे दुर्ग साहित्य संमेलन सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त काळ इतिहासाची साक्ष देणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्यावर थाटात संपन्न झाले. या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वागताध्यक्ष सरखेल कान्होजी आंग्रेंचे नववे वंशज रघोजीराजे आंग्रे, गोनिदा दुर्ग साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देव, वीणा देव, गोनिदा मंडळाचे विश्वस्त अभिजीत बेल्हेकर, सरपंच सुनील खडपे, अ‍ॅड्. अनंद देशपांडे, अविनाश पाटील, मुकुंद गोंधळेकर, पुरातत्त्व खात्याचे राजन दिवेकर आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग आरमार, स्वराज्यासाठी त्याची बांधणी, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जलदुर्गातील आरमाराचा दबदबा. ब्रिटिश, डच, फ्रेंच यांना केलेली पळताभुई अशा इतिहासाची मांडणी मनोहर आवटी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात केली. ते म्हणाले, छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेसाठी जलदुर्गाशी आंग्रे यांनी नाते जुळवून केलेली कामगिरी साक्ष देत आहे. ते महाराजांशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले त्यामुळेच पेशव्यांनी इंग्रजांच्या साथीने तुळाजी आंग्रेंना विसापूर किल्ल्यावर कैदेत ठेवले हा इतिहास विसरता येणार नाही.
 इंग्रजांच्या तोडीचे आरमार मराठय़ांना बनविता आले नसले तरी मराठी आरमाराचा सागरी दबदबा इंग्रज, डच, फ्रेंच अशा सर्वच परकीयांना पळताभुई करणारा ठरला. त्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांची कामगिरी मोलाची होती. या शौर्यगाथा मराठी माणसाला अभिमानास्पद असल्याचे सांगून आवटी म्हणाले, मराठी बोलतो तो मराठा, तोच महाराष्ट्र धर्म. हल्ली महाराष्ट्रीयन शब्द बोलला जात आहे. तो शब्द चुकीचा असून, महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व धर्मीयांनी मराठी बोलतो तोच मराठा, महाराष्ट्र धर्म छत्रपतींनी सांगितल्याचे लक्षात घ्यावे, तसेच महाराजांनी जात-पात पाळली नसल्यानेच त्यांनी आदर्शवत स्वराज्य स्थापन केले, असे आवटी म्हणाले.
स्वागताध्यक्ष रघुजीराजे आंग्रे म्हणाले, कोकण ही परशुरामाची भूमी आहे. या भूमीतील समुद्रावर आमच्या पूर्वजांनी छत्रपतींच्या स्वराज्यनिर्मितीत मोलाची कामगिरी केली, ती आम्हाला भूषणावह वाटते. स्वराज्याचे तोरण बांधताना परकीयांना पश्चिम किनारपट्टीवरून पळताभुई केली, ही छत्रपतींच्या इतिहासातील साडेतीनशे वर्षांपूर्वीची शौर्यगाथा आजच्या पिढीला सांगितली गेली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे आजही दखल घेण्याजोगी आहेत. त्यांनी वृक्षांचे महत्त्व सांगितले आणि सरखेल कान्होजी आंग्रेंनी वृक्षसंवर्धन केले, तसेच अलिबागजवळ तोफांचा व बंदुकांचा कारखाना काढला. बंदुकांसाठी लागणाऱ्या वृक्षांची मोठी गरज वृक्षसंवर्धनातून साधली. त्यामुळे आजही वृक्षसंवर्धनाचा महाराजांचा संदेश आचरणात आणण्याची गरज आहे, असे रघुजीराजे आंग्रे म्हणाले.
छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य, शौर्यगाथा, तसेच मावळ्यांनी केलेली मर्दुमकी इतिहासाची साक्ष देणारी असूनही चौथी, पाचवीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात दुर्मीळपणा जाणवतो. शिवरायांची शौर्यगाथा त्रोटकपणे मांडून परकीयांच्या इतिहासाचे उदात्तीकरण मनाला खुपते. आपल्या मुलांना शिवराय व त्यांच्या मावळ्यांचा इतिहास समजला तरच राष्ट्रप्रेम, स्वाभिमानी वृत्ती वाढेल म्हणूनच शालेय पाठय़पुस्तकात परकीयांच्या नव्हे तर शिवरायांच्या इतिहासाची व्यवस्थित मांडणी करून राष्ट्रभावना, राष्ट्रतेज निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे रघुजीराजे म्हणाले.
या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ शिवदुर्ग साहित्यिक अण्णासाहेब शिरगावकर यांनी गोनीदा तथा अप्पा दांडेकर व आपली झालेली भेट आणि त्यांच्या परीस स्पर्शाने साहित्यिक बनलो, असे सांगत ते म्हणाले. त्या काळी गोनीदा यांच्यासोबत किल्ले भटकंती करताना अंगात रोमांच उभा राहायचा. किल्ले भटकंती ही आमच्या दृष्टीने महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा देणारी ठरली. त्यामुळेच ताम्रपटांचे संशोधन केले.
परशू आणि कुऱ्हाड यांचा वाद साहित्य संमेलनात रंगला त्याचा उल्लेख अण्णा शिरगावकर यांनी केला. दुर्ग साहित्य संमेलनातही आठ दिवस अगोदर, असा वाद निर्माण करून संमेलन यशस्वी करता आले असते, पण असे वाद निर्माण करून साहित्य संमेलन यशस्वी होत नाही. तसा पायंडा दुर्ग साहित्य संमेलनात नसल्यानेच छत्रपती शिवराय व त्यांचे मावळे यांच्या जिवंत इतिहासाची पाने आज विजयदुर्गवर उलगडता आली, असे शिरगावकर म्हणाले.
मनोहर आवटी यांनी इतिहासाची पाने अध्यक्षस्थानावरून उलगडली त्याची मांडणी ग्रंथातून करावी, असे सुचवून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाच्या चुका समुद्रात व सह्य़ाद्रीच्या भूमीत होणार नाहीत यासाठी किल्ले साहित्य ग्रंथांच्या रूपात निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. सागरी जीवन, विजयदुर्गचे महत्त्व सांगत शिवशाहीर पुरंदरे यांनी मराठय़ांची पोरे आम्ही घाबरणार नाही, अशा ताठ मानेने जगले पाहिजे, असे सांगून माझे वय ९१ वर्षांचे झाले, असे सांगणाऱ्या सर्वानी माझा १०१वा जन्मदिवस सन २०२२ मध्ये आहे त्यासाठी सर्वानी हजर राहावे, असे निमंत्रण देऊन माणसाची उंची अभ्यासणे हेच महत्त्वाचे काम असते, असा संदेश दिला.
कवी वसंत बापट व विजयदुर्गाची यशोगाथा सांगणारे माधवगीत अशोक किरतरे यांनी सादर केले. दुर्ग साहित्य पुरस्काराने निनादराव बेडेकर यांना सन्मानित करण्यात येणार होते, पण ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्याकरिता अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारून त्यांच्याकडे पोहोचविण्याचे अभिवचन दिले. दुर्गग्रंथ स्मरणिका प्रकाशन मनोहर आवटी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देव यांनी सर्वाचा स्वागत व सत्कार केला, तर प्रेरणोत्सव समितीने कवडय़ांची माळ घालून स्वागत केले.
दुर्ग साहित्य मंडळाचे डॉ. विजय देव यांनी शिवजागर, दुर्गजागर व्हावा म्हणूनच गोनीदांनी साहित्य निर्माण केले. त्यामुळेच छत्रपतींच्या शौर्यगाथा सर्वासमोर जाण्यासाठी विजयदुर्गवर हे संमेलन भरविले असून, शिवमेय जयते, दुर्गमय जयते असा संदेश या संमेलनातून जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे देव म्हणाले.
गोनीदा दुर्ग साहित्य मंडळाचे विश्वस्त अभिजीत बेल्हेकर म्हणाले की, महाराष्ट्रात ५०० किल्ले आहेत. त्यावर व्यापक चर्चा व्हावी, असे आमच्या मंडळाला वाटते. महाराष्ट्राला हे किल्ले आर्थिक संपन्नता आणू शकतात, परकीयांच्या विरोधात संरक्षणासाठी किल्ल्यांचा उपयोग होऊ शकतो, असे सांगताना त्यांनी गोनीदा यांची किल्ले भटकंती विषद केली.
शहरी लोकांना किल्ले, इतिहास खुणावतोय म्हणून ते किल्ल्यावर पोहोचत आहेत, त्यासाठी शासनाने किल्ले विकास करायला हवा. महाराजांनी दहशतवाद रोखण्यासाठी केलेली कामगिरी आजही किल्ले विकसित करून करता येईल, असे बेल्हेकर म्हणाले.

First Published on January 28, 2013 3:08 am

Web Title: directive development policy of shivaji maharaj