बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे संचालक अमित बंदे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गेल्या महिन्याभरापासून बंदे फरार होते. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्यांची संख्या आता १७ झाली आहे.
गडचिरोलीतील १८ कोटीच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेने प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक संजय सातपुते व विजय बागडे यांच्यासह १६ जणांना यापूर्वीच अटक केली होती. हा घोटाळा उघडकीस येताच गडचिरोलीतील सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे संचालक अमित बंदे फरार झाले होते. तेव्हापासूनच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील त्यांच्या मार्गावर होते. सोमवारी रात्री बंदे यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, बंदे यांच्यावर सर्वप्रथम गुन्हा दाखल झाला होता. मात्र, ते पोलिसांना चकमा देत होते. बंदे यांच्या संस्थेने सर्वाधिक शिष्यवृत्ती उचलल्याची माहिती तपास अधिकारी पाटील यांनी दिली. दरम्यान, बहुतांश संस्थाचालकांचा जामीन न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता एकेकाला अटक करण्यात येत आहे. यातील काही आरोपी विशिष्ट पक्षाशी संबंधित आहेत, तसेच काही अन्य राज्यात पळून गेले असल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. या सर्वाचा शोध पोलिस घेत आहेत.
काटोल व नागपुरातील विद्यानिकेतन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचाही यात समावेश आहे. या कॉलेजचे संस्थाध्यक्ष सचिन रामकुंवर जयस्वाल यांनी बोगस विद्यार्थी दाखवून मोठय़ा प्रमाणात शिष्यवृत्ती उचलली. त्यांच्या संस्थांच्या कार्यालयात पोलिस दलाने छापे मारले असता त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांची बोगस शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जात व उत्पन्नाच्या दाखल्यांसह अनेक कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती तपास अधिकारी रवींद्र पाटील यांनी दिली. मात्र, जयस्वालही फरार आहेत. सचिन जयस्वाल यांना अटक करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाची तीन पथके आज वर्धा, नागपूर व काटोल येथे सातत्याने चकरा मारत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात जयस्वालही हाती लागतील, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्यातरी न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर फरार झालेल्या सर्व संस्थाचालक, प्राचार्य, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अटकेचे सत्र पोलिसांनी आरंभले आहे.