कलावंत मनस्वी असतात हे सर्व जण म्हणतात, पण मांडलेला डाव असा उधळून जाण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? राजीव निघून गेला. त्याने मित्रांचा विश्वासघात केला. त्याला ‘ऑस्कर’पर्यंत धडक मारायची होती, पण ते सर्व आता अपूर्णच राहिले..
मराठी चित्रपटसृष्टीत नाशिकचे नाव थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत घेऊन जाणारे दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या निधनाच्या वृत्तावर येथील त्यांच्या मित्रांचा अजूनही विश्वास बसण्यास तयार नाही. ज्या शहराने त्याचे अभिनयातील गुण, दिग्दर्शनातील चमक जोपासली, त्या शहरातील त्याचे हितचिंतक आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत आहेत. युवा दिग्दर्शक आणि लेखक दत्ता पाटील त्यापैकीच एक. भविष्यात काय काय करायचे याची आखणी आम्ही गप्पांदरम्यान करीत होतो. राजीवला ऑस्कपर्यंत धडक मारायची होती, असे ते सांगतात. ‘वंशवेल’ या चित्रपटानिमित्त राजीवने अठरा नायिकांना एका गाण्यावर नृत्य करावयास भाग पाडले. मराठी चित्रपटसृष्टीतील हा विक्रमच. या चित्रपटातील गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेचे मुंबई येथे नुकतेच प्रकाशनही झाले. रविवारी रात्री मुलाखत आणि पुढील नियोजनाबाबत आमचे बोलणेही झाले. हे सर्व सुरू असताना सर्व मित्रांना गाफील ठेवून तो सोमवारी अचानक निघून गेला. एक दर्जेदार चित्रपट देणारा, प्रसंगी आक्रमक होणारा, विचारांची सखोलता जपणारा हुरहुन्नरी दिग्दर्शक पडद्याआड गेला. दादासाहेब फाळके यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत नाशिकची नवी ओळख त्याने निर्माण केली होती, असे पाटील यांनी त्यांच्याबद्दल सांगितले. दिग्दर्शक व अभिनेता सचिन शिंदे यांनी राजीवच्या आठवणी सांगताना नाटक व चित्रपट हा राजीवचा श्वास होता असे नमूद केले. त्याच्या स्वप्नांचे सुरुवातीला आम्हाला हसू यायचे. मात्र त्याने जे जे सांगितले त्याच्या दिशेने त्याची पावले पडण्यास सुरुवात झाली होती. मुंबईसारख्या शहरात नाशिकमधून येणाऱ्या नवोदितांसाठी त्याने पाया तयार करून दिला होता. नाशिकचा म्हणजे राजीवचा मित्र असेच काहीसे होऊन गेले होते. काम करताना तडजोड त्याला मान्य नव्हती. कोणापुढे हाजी हाजी करायची नाही हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कधी कोणापुढे हात पसरले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
लहानपणापासून राजीवचे मित्र असलेल्या सूर्यकांत भोसले यांनी राजीवने अतिशय कमी वेळात खूप यश मिळविल्याचे सांगितले. आम्ही चित्रपट क्षेत्रात सोबतच काम करायला सुरुवात केली. नंतर कामाच्या निमित्तानेही आमच्या भेटीगाठी होत राहिल्या. यशाचे एक एक शिखर गाठत असताना तो तसाच निघून गेला, अशी भावना भोसले यांनी व्यक्त केली. ‘वंशवेल’ या चित्रपटाचे निर्माते दामोदर मानकर यांनी चित्रपटाच्या कामानिमित्ताने ते आमच्या परिवाराचे सदस्य होऊन गेल्याचे नमूद केले. ‘वंशवेल’ प्रदर्शित होईल, पण राजीव आपल्यात नसणार याचे दु:ख असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.