धवल कुलकर्णी

करोनाच्या चाचण्या करण्यासाठी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असला तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाचे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचलनालय वैद्यकीय यंत्रणेच्या मदतीला गेली आहे.

संचालनालयाने आपल्याकडे असलेले सहा रिअल टाईम पोलिमररेट चेन रिॲक्शन अर्थात RTPCR मशीन करोनाचे सॅम्पल तपासायला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आणि रुग्णालयांना दिल्या आहेत. मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद अमरावती आणि नाशिक येथील हे मशीन प्राण्यांचे नमुने तपासण्यासाठी वापरले जातात. या मशीनच्या माध्यमातून आलेल्या मऊसाचा नमुना गायीचा म्हशीचा तो अन्य कुठला प्राण्याचा आहे याचा जनुकीय निष्कर्ष देता येतो.

आता ही सामग्री करोनाच्या सँपल तपासणीसाठी वापरण्यात येईल, असे गृह खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. हे मशीन दर दिवशी साधारणपणे अडीचशे ते तीनशे नमुने तपासून आपला निष्कर्ष देऊ शकतात.

हे मशीन जरी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांकडे असले तरीसुद्धा त्यांच्याकड बायो सेफ्टी ची तरतूद नव्हती. त्यामुळे करोना तपासणीच्या चाचण्या प्रयोगशाळांना करता येत नव्हत्या. आता ही यंत्रसामग्री सरकारी रुग्णालयांना आणि महाविद्यालयांना दिल्यामुळे संशयितांचे रिपोर्ट लवकर येण्यास मदत होईल. या मशीनचा वापर केंद्राने नुकत्याच परवानगी दिलेल्या पूल टेस्टिंगसाठी करता येऊ शकतो.