24 January 2021

News Flash

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाकडून सग्या सोयऱ्यांची वर्णी

भाजपा आंदोलन छेडणार

कोल्हापूर: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मागील दाराने नोकरभरती केली आहे. विद्यमान सभापतींचा नातू, इतर संचालकांचा मुलगा-मुलगी, पुतण्या- पुतणी, भाचा-मेहुणा अशा २९ सग्या सोयर्‍यांची बेकायदेशीररित्या भरती करण्यात आली आहे.
बाजार समितीचे नुकसान करून, स्वत:च्या नातेवाईकांची सोय बघणार्‍या संचालक मंडळावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा भाजप तीव्र आंदोलन छेडेल,असा इशारा भगवान काटे आणि नाथाजी पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.

प्रत्यक्षात बाजार समिती मधील २४ पदांच्या भरतीसाठी, ४ हजार बेरोजगारांचे अर्ज आले होते. पण या सर्व बेरोजगार तरूणांना डावलून, संचालक मंडळाने आपल्याच सग्यासोयर्‍यांची भरती केली आहे. त्याशिवाय मागील संचालक मंडळाने भरती केलेल्या, पण प्रशासकांनी कामावरून कमी केलेल्या ३७ कंत्राटी कर्मचार्‍यांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुन्हा बाजार समितीच्या नोकरीत हजर करून घेतले आहे. त्यामुळे आकृती बंधापेक्षा ३७ कर्मचार्‍यांच्या वेतनाचा अतिरिक्त ताण, बाजार समितीच्या तिजोरीवर पडणार आहे.

बाजार समिती मधील २४ पदांच्या भरतीसाठी ४ हजार अर्ज आले आहेत. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया स्थगित झाली होती. त्यानंतर पदोन्नतीच्या कारणावरून एक कर्मचारी न्यायालयात गेल्याने पुन्हा भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपत आल्याने, नोकरभरती करून, सग्यासोयर्‍यांची बेकायदेशीर रित्या नियुक्ती केली. १६ सप्टेंबर २०१९ च्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार, १७ सप्टेंबर पासून २९ जणांना हंगामी कर्मचारी म्हणून ठोक मानधनावर हजर करून घेतल्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे. तर २४ जून रोजी त्या सर्वांना सेवेत कायम करण्याचा तातडीने ठराव करण्यात आला. १ जुलै पासून त्या सर्वांना कायम सेवेमध्ये सामावून घेतले आहे. मात्र विद्यमान कर्मचार्‍यांनी हजेरी पत्रकावर सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे हजेरी पत्रक बदलून, ४ जुलै पासून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.

मागील दाराने भरती केलेल्यांची यादी पुढील प्रमाणे-
विद्यमान सभापती दशरथ माने यांचा नातू पवन पांडुरंग माने, माजी सभापती परशुराम खुडे यांचा मेहुणा विलास घाटगे, कृष्णात पाटील यांचा पुतण्या चंद्रदीप रामराव पाटील, बाबासो लाड यांचा भाचा सुनील शेळके, सर्जेराव पाटील यांचा मुलगा विजयसिंह पाटील, माजी उपसभापती संगीता पाटील यांचा मुलगा संग्राम नानासो पाटील, विलास साठे यांची पुतणी अमृता साठे, शारदा पाटील यांचा पुतण्या सचिन दिनकर पाटील, उदयसिंह पाटील यांचा मुलगा सत्यजीत पाटील, आशालता पाटील यांचा मुलगा सुभाष आनंदराव पाटील, बाबुराव खोत यांचा मुलगा सुमित खोत, अमित कांबळे यांचा मेहुणा दिपक कांबळे, संजय जाधव यांची मुलगी सुप्रिया चाबुक, नंदकुमार वळंजू यांचा मुलगा संभाजी वळंजू, नेताजी पाटील यांचा भाचा नामदेव चव्हाण, शशिकांत आडनाईक यांचा भाचा नितीन पाटील.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संबंधीत संतोष पोवार आणि शांताराम पांडुरंग पाटील यांचे नावही नव्याने भरती केलेल्यांमध्ये आहे. तर ऑडिटर मार्फत विजय ढेंगे, संचालक सदानंद कोरगांवकर यांच्याशी संबंधीत तुषार पाटील, ऑफीसच्या नावावर यशवर्धन वारके यांना घाईगडबडीने कामावर हजर करून घेण्यात आले आहे. मागील संचालक मंडळाने अशाच पध्दतीने ३७ कर्मचार्‍यांची भरती केली होती. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तरीही विद्यमान संचालक मंडळाने कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीर रित्या नोकर भरती केली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर ३७ कर्मचारी अतिरिक्त ठरणार असल्याने, त्यांच्या वेतनापोटी २ कोटी रूपयांचा जादा भार बाजार समितीच्या तिजोरीवर पडणार आहे. संचालक मंडळाच्या हट्टासाठी आणि त्यांच्या सग्या सोयर्‍यांची सोय करण्यासाठी, बेकायदेशीरपणे केलेल्या नोकर भरती विरोधात भारतीय जनता पार्टी व्यापक आंदोलन छेडणार आहे. जो पर्यंत ही भरती रद्द केली जात नाही आणि संचालक मंडळ बरखास्त होत नाही, तोपर्यंत नोकरीसाठी अर्ज केलेल्या ४ हजार जणांना एकत्र करून भारतीय जनता पार्टी तीव्र लढा उभारणार आहे. या बेकायदेशीर प्रक्रियेविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे शासन नियुक्त माजी संचालक पाटील आणि काटे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 9:21 pm

Web Title: directors in kolhapur agricultural produce market committee gave chance to their relatives for job scj 81
Next Stories
1 मुंबईत ऑगस्टमध्ये करोना नियंत्रणात येईल-हसन मुश्रीफ
2 गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येऊ इच्छिणा-यांना ७ दिवस अलगीकरण कक्षात ठेवावे !
3 १८ तासांनी कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरू
Just Now!
X