‘महानेट’चे खांब रस्ता विस्ताराच्या आड; ठेकेदाराला नोटीस

पालघर : महाराष्ट्रातील १३ हजार ग्रामपंचायतींना उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी करण्यासाठी भारत नेट (महानेट) प्रकल्पामार्फत भूमिगत व हवाई मार्गाने वाहिन्या टाकण्याचे काम पालघर तालुक्यात ठिकठिकाणी सुरू आहे. सार्वजनिक काम असल्याने या कामात सवलत देण्यात आली आहे, त्याचा गैरफायदा घेत अनेक मार्गाच्या विस्तारित क्षेत्रातच या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केल्याने या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला नोटीस पाठविली आहे.

इंटरनेट उपलब्ध करून देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सिंगल विंडोमार्फत मार्गाचा हक्क (राईट ऑफ वे) देण्याचे परिपत्रक राज्य सरकारने १७ फेब्रुवारी २०१८ रोजी काढले होते.  त्यानुसार महानेट प्रकल्पासाठी रस्ते खोदण्याचे, वाहिन्या टाकण्याचे काम करण्यापूर्वी पाच दिवस आधी संबंधितांकडून परवानगी घेण्याऐवजी त्याना सूचित करण्यात यावे अशी मुभा देण्यात आली. या सवलतीचा गैरफायदा घेऊन कोणत्याही संबंधित विभागाची चर्चा न करता रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या महानेटच्या ठेकेदारांनी  रस्ता रुंदीकरण क्षेत्रांमध्ये भूमिगत तसेच हवाई वाहिन्या टाकण्याकामी खांब उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

पालघर-बोईसर मार्गावर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कोळगाव ते खारेकुरण फाटा या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या डांबरी रस्त्याच्या मध्यापासून किमान नऊ मीटर अंतरावर किंवा रस्त्याच्या हद्दीपर्यंत अंतरापलीकडे टाकणे आवश्यक आहे. मात्र रस्ता विस्ताराचा विचार न करता महानेटने डांबरी रस्त्याचे लगत काही फुटांवर खोदकाम केले आहे. अन्य काही ठिकाणी रस्त्यापासून काही फुटांवर वाहिन्या वाहून नेण्यासाठी खांब उभारले आहेत.

पालघर शहराच्या टेंभोडे भागात सातपाटी मार्गालगत देखील महानेटने अशाच प्रकारचे खांब उभारले आहेत.  टेंभोडे-सातपाटी मार्ग हा २४ मीटररुंदीचा रस्ता पालघर नगरपरिषदेच्या विकास आराखडामध्ये मंजूर झाला आहे. कालांतराने हा परिसर विकसित झाल्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर महानेटतर्फे उभारण्यात येणाऱ्या खांबांचा अडथळा होईल असे दिसून येते.

‘पूर्वसूचना न देता काम’

विकास आराखड्यात असलेल्या रस्त्याच्या रुंदीचा विचार करून भूगर्भात वाहिन्या टाकणे किंवा हवाई वाहिन्यांसाठी खांब उभारताना विशिष्ट अंतर सोडणे अपेक्षित असते, मात्र त्याचे पालन झालेले नाही. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता  रस्त्याचा विस्तार कमी-जास्त किंवा अन्य काम करताना विभागाला कोणतेही पूर्वसूचना दिलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.  यापुढे रस्त्यांच्या होणाऱ्या रुंदीकरणाच्या कामा दरम्यान महानेटचे नुकसान झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहणार नाही, ठेकेदाराला पत्राद्वारे सूचित केले आहे. खोदकाम करताना डांबरी पृष्ठभागाचे पुनस्र्थापन करण्याची जबाबदारी संबंधितांवर असेल असे ठेकेदाराला सांगण्यात आले आहे.  केबल वाहिनीची आखणी प्रस्ताविक चौपदरीकरण व रुंदी करण्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या मध्यापासून नमूद केलेल्या अंतरापलीकडे असावी, असेदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला सांगितले आहे.