मंत्रिमंडळातील खातेवाटप असो किंवा मंत्र्यांसाठी चांगल्या बंगल्यांचा प्रश्न असो महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातील सहकारी भांडत असल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. भाजप आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आटापिटा करत नसली तरी राजकारणामध्ये सर्व काही शक्य आहे असे सांगत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेबरोबर आगामी काळात युतीच्या शक्यतेचे दरवाजे खुले ठेवले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रवीण दरेकर यांनी दौरा केला असता पत्रकारांशी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचली असून पालघरच्या विकासासाठी फडणवीस यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची जनतेला जाण असून पालघरमध्ये भाजप प्रमुख पक्ष म्हणून या निवडणुकीत विजयी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नसल्याचे सांगून राज्यपालांनी दिलेल्या नुकसानभरपाईची रक्कम आजवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा त्यांनी केला. पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत विकासाच्या कामाची गती काहीशी कमी असल्याचे मान्य करीत आगामी काळात त्याची भरपाई करू तसेच विकासकामांसाठी वितरित होणाऱ्या सर्व निधीचा विनियोग होईल असे आश्वासन दिले.