राज्यातील दारूची  दुकाने उघडणार या बातमीनंतर विरार शहराच्या विविध भागातील मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर (वाईन शॉप) मद्यप्रेमींची सकाळपासून मोठी गर्दी जमली होती. काही ठिकाणी तर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मात्र दुपारपर्यंत एकही दुकान न उघडल्याने रांगेत उभे असणाऱ्यांची निराशा झाली. दरम्यान, मद्याची दुकाने उघडण्याचे कुठलेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नसल्याने दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार नसल्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाने स्पष्ट केले.

टाळेबंदीमुळे मागील सव्वा महिन्यांपासून मद्य विक्रीची दुकाने (वाईन शॉप) आणि बिय़र बार बंद आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच पंचाईत झाली होती. मात्र काल सोमवार नंतर मद्यविक्रीची दुकाने उघडली जाणार असल्याची बातमी वेगाने पसरली. सोमवारी सकाळपासून वसई विरार शहरातील विविध मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर मद्य विकत घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्य. विरार मधील राज वाईन शॉप, कामत वाईन शॉप, आर जे वाईन, सोपारा येथील लक्ष्मी वाईन शॉप, पूनम बार अशा अनेक ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात दारूसाठी गर्दी केली होती. दारू खरेदीसाठी मद्यप्रेमींनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टंसिंगचे पालन झाले नाही. अनेक ठिकाणी गर्दी आणि जमाव तयार झाल्याने पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  बळाचा वापर सुद्धा केला. पोलिसांनी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पळवून लावले. या नंतर दुकानदारांनी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत असे फलक लावले. यामुळे तळीरामांची पूर्णतः निराशा झाली. आज वसई- विरार मधील दारूची दुकाने सुरु झाली नाहीत. गर्दीमुळे दुकानासमोर दुकानदारांनी दुकाने पुढील आदेश मिळेपर्यंत सुरु केली जाणार नाहीत, असे फलक लावले होते.

दरम्यान, पालघरच्या राज्य उत्पादक शुक्ल विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन यांनी दारूचे दुकाने सुरु करण्याचे कोणतेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले नाहीत. पुढील आदेश आदेश मिळेपर्यंत सुरु केली जाणार नाहीत, असे स्पष्ट केले.

सोमवारी दुपारपर्यंत दुकाने उघडली गेली नसल्याने नागरिकांची निराशा झाली. मात्र काही ठिकाणी ग्राहकांना टोकन नंबर देण्यात आले आहेत. नालासोपारा मधील एका मद्यविक्रेत्याने चक्क टोकन नंबर ग्राहकांना दिले आहेत.