सांगली : संभाव्य महापुराला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी मदत कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कृष्णा नदीपात्रात देण्यात आले. युवा शिवप्रतिष्ठानच्यावतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या प्रलंयकारी महापुरामध्ये सांगली, मिरजेसह जिल्ह्य़ातील १०४ गावांना तडाखा बसला होता. त्यावेळी आलेल्या महापुरावेळी मदत करण्यासाठी आणि बचावासाठी अनेक सामाजिक संघटना धावून आल्या होत्या. मात्र काहीजणांना योग्य प्रशिक्षण नसल्याने इच्छा असूनही या बचाव कार्यात सहभागी होता आले नव्हते. ही उणीव पुन्हा भासू नये यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे युवा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये रॉयल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील व विश्वसेवा फौंडेशनचे विकास बोळाज यांनी प्रत्यक्ष नदीत प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले. भूलशास्त्रतज्ञ संघटना सांगली – मिरज तर्फे डॉ. मोहन पाटील, डॉ. स्मिता ऐनापुरे, डॉ. विनायक पाटील यांनी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला कसे ओळखायचे, यापासून त्याच्या वर प्राथमिक उपचार करीत त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत काय करायचे याचे संपूर्ण प्रशिक्षण यावेळेस त्यानी करून दाखवून मार्गदर्शन केले. यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, नगरसेवक मंगेश चव्हाण व अभिजित भोसले, महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी महापुरावेळेचे अनुभव कथन करीत काय करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले.
या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रॉयल कृष्णा बोट क्लब, विश्वसेवा फौंडेशन, एचईआरएफ हेल्पलाईन इमरजन्सी फौंडेशन, स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाइन, निर्धार फौंडेशन, जनसेवा फौंडेशन स्पेशल रेस्क्यू फोर्स, अग्निशमन विभाग, रुग्ण वाहिका सेवा, टायगर ग्रुप, इन्साफ फौंडेशन, जय मल्हार क्रांती संघटना व स्वराज्य प्रतिष्ठान आदी या आपत्ती व्यवस्थापन नियोजन प्रशिक्षण कार्यक्रममध्ये सहभागी झाले होते. अजिंक्य बोळाज, प्रकाश निकम, सचिन देसाई, अमोल बोळाज, युवराज जाधव, अक्षय रेपे, ओंकार जाधव, मंगेश कांबळे, दिगंबर साळुंखे, संग्राम घोरपडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.