गेल्या आठवडाभरात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरण व नद्यांमधील पाणीपातळीत वाढ झाली असल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेने आपत्ती निवारण यंत्रणा दक्ष ठेवली आहे. नाव, यांत्रिक बोट यासह अन्य साहित्यानिशी यंत्रणा सज्ज झाली असून, कोणत्याही धोक्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.
पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून, भविष्यातील महापुराचा धोका ओळखून जिल्हा परिषदेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. महापुराचा धोका ओळखून जिल्हा परिषदेने जिल्ह्यात सर्वत्र ५९ नौका व ८ यांत्रिक बोटी सज्ज ठेवल्या आहेत. करवीर तालुक्यात ५, गडिहग्लज तालुक्यात ५, भुदरगड तालुक्यात ५३, चंदगड तालुक्यात १, शिरोळ तालुक्यात १८, पन्हाळा तालुक्यात ७, गगनबावडा तालुक्यात २, कागल तालुक्यात १, हातकणंगले तालुक्यात ५, राधानगरी तालुक्यात ७, शाहूवाडी तालुक्यात ४ अशा एकूण ५९ बोटी सज्ज ठेवल्या आहेत. त्यामधील अनेक नौका सध्या गावक-यांची नदीतून वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. तसेच महापुराचा सर्वाधिक धोका असणा-या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात ८ यांत्रिकी स्पीड बोटी तयार ठेवल्या आहेत.