मागील काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून कोयना धरण व्यवस्थापनाने आज (शुक्रवार) (दि १८) २१०० क्येसूक पाण्याचा विसर्ग केला आहे. सध्या धरणात २७ हजार क्यूसेक पाण्याची आवक आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापानाने दिली.

महाबळेश्वर, नवजा, कोयनेसह पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणात प्रतिसेकंद सरासरी २७ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आज कोयना धरण पायथा वीज गृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर ६४९, नवजा ६९४, तर महाबळेश्वरला ८०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची जलपातळी २०८७.३फूट (६३६.१९) मीटर झाली असून, धरणाचा पाणीसाठा ३५.९८ टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पावसाचा जोर कायमच असल्याने मनमोहक धबधब्यांचा परिसर असणाऱ्या निसर्गरम्य कोयना विभागातील सर्व धबधबे प्रवाहित होऊन ओसंडून वाहू लागले आहेत.

कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी लोकसत्ता’ला सांगितले की, सांगली पाटबंधारे विभागाचे दहा दिवसापूर्वी नदीतून मोठमोठ्या फळ्या काढण्याचे काम सुरु असल्याने नियमीतपणे सुरु असलेले हे पाणी बंद केले होते. पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून आरक्षित केलेला पाणीसाठा वापराविना संपून जावू नये व संभाव्य पुराच्या वेळी हे पाणी काढावे लागणार आहे. पूरामध्ये हे पाणी विनाकारण सोडावे लागू नये म्हणून हे पाणी सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुसळधार पावसामुळे अगोदरच कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच आता पायथा वीज गृहातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या लोकवस्ती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आवश्यक त्या खबरदाऱ्या घ्याव्यात, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनासह महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.