नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलो ही माहिती प्रसारमाध्यमांतून कळली.. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत नाटय़ परिषदेने चार ओळीचे पत्रही पाठवले नाही.. परिषदेच्या कार्यपद्धतीत शिस्त आवश्यक असून कामकाजाला ‘बाजारा’चे स्वरूप येता कामा नये.. शिस्तीसाठी आपण समुपदेशन करणार असल्याचे परखड बोल नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी सुनावले. नाटय़संमेलनाची समाप्ती होत असतानाच रविवारी झालेल्या नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीतच हे शिस्तनाटय़ रंगले.
नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक रविवारी सकाळी संमेलन स्थळावर झाली. या बैठकीत डॉ. मोहन आगाशे यांनी परिषदेच्या कार्यसंस्कृतीबद्दल परखड बोल सुनावले.
‘बारामतीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचे नाटय़ परिषदेने आजतागायत मला लेखी कळविलेले नाही. माझे अभिनंदन करणारे चार ओळीचे पत्रदेखील पाठविण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरूनच मी अध्यक्षपदी निवडून आल्याचे मला समजले. त्यावर विश्वास ठेवूनच मी बारामतीला आलो,’ अशा शब्दांत आगाशे यांनी नाटय़ परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले. परिषदेकडून भविष्यात अशी चूक न होण्याची अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, आगामी ९४व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनासाठी सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत.  नाटय़ परिषदेच्या नगर, नाशिक, नागपूर, सातारा, महाबळेश्वर या शाखांसह पंढरपूर आणि मंगळवेढा शाखांनी संयुक्तपणे निमंत्रण दिले आहे.    

बारामतीत झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचे नाटय़ परिषदेने आजतागायत मला लेखी कळविलेले नाही. माझे अभिनंदन करणारे चार ओळीचे पत्रदेखील पाठविण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.