एजाज हुसेन मुजावर

लोकसभा निवडणुकीत वर्चस्व राखल्यानंतर भाजप-शिवसेना महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत प्राप्त करण्याचा विडा उचलला असताना सर्व विरोधक हतबल झाले आहेत. स्वत:चे साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्था व अन्य संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सत्ता हेच सर्वश्रेष्ठ साधन बनले आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांसह अनेक नेते महायुतीच्या वाटेवर असल्याचे चित्र जिल्ह्य़ा जिल्ह्य़ात दिसून येते. सोलापूर जिल्ह्य़ातही दोन्ही काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती दिसते आहे. आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता जिल्ह्य़ातील काही बडे प्रस्थ भाजपची वाट चोखाळण्याच्या मानसिक स्थितीत पाहावयास मिळाले. यानिमित्ताने एकीकडे दोन्ही काँग्रेसच्या तंबूमध्ये अस्वस्थेतेचे वातावरण असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपमध्ये गटबाजीतून शह-काटशहाचे राजकारणही खेळले जात असल्याचेही चित्र दिसते आहे.

विरोधकांपैकी अनेक जणांना आगामी विधानसभा निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे, याची चिंता सतावू लागली आहे. सोलापुरातही असेच चित्र दिसत असताना तिकडे भाजपमध्ये येणाऱ्यांची गर्दी वाढू लागल्याने आता येणाऱ्यांना पारखूनच घ्यावे लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. केवळ सत्तेची ऊब घेण्यासाठी पक्षात येऊ इच्छिणाऱ्या मंडळींना पारखून घेतले नाही तर पक्षातील जुन्या मंडळींना प्रतीक्षेतच राहावे लागेल. याच मुद्दय़ावर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत असतानाच पक्षांतर्गत गटबाजीतून इतर पक्षातील मंडळींना प्रवेश मिळवून देण्यावरून सोलापुरात पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात शह-काटशहाचे राजकारण खेळले जात असल्याचे पाहावयास मिळू लागले आहे.

विरोधकांची ताकद घटली

सोलापूर जिल्ह्य़ात ११ पैकी चार आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि शिवसेना व शेकापचा प्रत्येकी एक आमदार आहे. मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय स्वरूपात घटली आहे. सध्या माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावांवर चर्चेचा केंद्रिबदू दिसून येतो. मात्र यापैकी एकही आमदार आपण पक्षांतर करणार असल्याचे उघड न करता सर्व काही गुपित राखत आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापूर भेटीत त्यांच्या स्वागताप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांनी जो उत्साह दाखविला, त्यावरून त्या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले.

शह-काटशहाचे राजकारण

या पक्षांतराच्या संभाव्य घडामोडीमागे भाजपअंतर्गत गटबाजीही उजेडात आली आहे. यात पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील राजकीय डावपेच, त्यांची एकमेकांना अडचणीत आणणारी भूमिका हा सार्वत्रिक चर्चेचा विषय बनला आहे. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी जवळीक साधून आहेत. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे बहुमत असतानादेखील पालकमंत्री देशमुख यांना या बाजार समितीचा सभापती करण्यात म्हेत्रे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. म्हणूनच की काय, म्हेत्रे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी पालकमंत्री खटपट करीत असल्याचे बोलले जाते. तर म्हेत्रे यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात प्रवेश देऊ नये म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भूमिका घेतली आहे. त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत आमदार म्हेत्रे यांना पक्ष प्रवेशाला जोरदार विरोध करताना, म्हेत्रे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली तर ‘भाजपमुक्त अक्कलकोट’ करण्याचा इशाराही देण्यात आला. अक्कलकोटमध्ये यापूर्वी दोन वेळा (१९९५ आणि २००९) भाजपने विधानसभा निवडणूक जिंकली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत तर याच अक्कलकोट भागातून भाजपला तब्बल ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या पार्श्वभूमीवर या पक्षाचे सचिन कल्याणशेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अक्कलकोटमध्ये जोरदार तयारी केली आहे. कल्याणशेट्टी हे सहकारमंत्री देशमुख यांचे विश्वासू अनुयायी समजले जातात.

माढय़ाचे राष्ट्रवादीचे वजनदार आमदार बबनराव शिंदे हे मोठे साखर कारखानदार आहेत. जिल्ह्य़ाच्या राजकारणात राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणात मोहिते-पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांनी आमदार शिंदे यांना मोठी ताकद दिली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांचे बंधू संजय शिंदे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले असता त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांना केवळ सहा हजारांच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा जिंकणे राष्ट्रवादीला सहजासहजी शक्य होणार नाही, असे दिसते. आमदार शिंदे यांना पराभूत करण्यासाठी मोहिते-पाटील यांच्यासह शिवसेनेचे उपनेते तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत ही मंडळी विधानसभा निवडणुकीची वाटच बघत आहेत. या दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे प्रयत्नशील आहेत. तर त्यास पालकमंत्री विजय देशमुख हे खो घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विसंगत चित्र दिसून येते. माढय़ातील भाजपची मंडळी सहकारमंत्री देशमुख व मोहिते-पाटील यांच्याशी जवळीक साधून आहेत. शिवाय मोहिते-पाटील गटाचाही आमदार शिंदे यांना विरोध आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे मातोश्रीवर जाऊन शिवबंधन घालणार असल्याची चर्चा असली तरी त्याचा सोपल यांनी इन्कार केला आहे. मात्र  विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविण्याबाबत हमी देण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. बार्शीत त्यांचे  स्पर्धक माजी आमदार राजेंद्र राऊत हे यापूर्वी २००४ साली सेनेच्या चिन्हावर सोपल यांच्यावर मात करून आमदार झाले होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि अलीकडे ते पुन्हा सेनेत परतले होते. सेनेतून त्यांनी भाजपवासी होणे पसंत केले आहे. महायुतीत बार्शीची जागा सेनेकडे आहे. विधानसभा लढविण्यासाठी राऊत हे  भाजपमधून सेनेत येऊ शकतात. जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसमधून बाहेर पडून महायुतीत प्रवेश करायचे म्हटले तर  ‘योग्य शब्द’ मिळवून देण्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे सध्या तरी भाजप प्रवेशाच्या केवळ चर्चा ऐकायला मिळतात आणि यातूनच भाजपमधील गटबाजीही पाहावयास मिळते, इतकेच.