महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम गट व मदन पाटील युवा मंचला डावलल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळला आहे. निष्ठावंत गटाला डावलून पक्षबदलूंना संधी दिल्याने युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन पक्षाच्या ‘समझोता एक्स्प्रेस’ला लाल बावटा दर्शविला आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या नेत्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपींच्या िपजऱ्यात उभे केले होते. गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांना काँग्रेसने टीकेचे लक्ष्य बनविले. मुंबईत एकत्र बसून सत्ता उपभोगणाऱ्या मंडळींनी सांगलीच्या निवडणूक मदानावर एकमेकांना टीकेचे लक्ष्य बनविले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींनी या निवडणुकीत प्रचारादरम्यान टीकेची परिसीमा गाठली होती.
ही टीकाटिप्पणी सांगलीकर जनता विसरली असल्याचा गरसमज करीत काँग्रेसने स्वीकृत सदस्यांची निवड करत असताना बेरजेचे राजकारण करीत निवडी जाहीर केल्या. पराभूत उमेदवारांना संधी न देता पक्षाच्या विजयासाठी त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळेल अशी भाबडी आशा काही कार्यकत्रे बाळगून होते. मात्र या आशाआकांक्षांना  मूठमाती देत काँग्रेसने भूखंड माफिया, जुगार अड्डा चालविणाऱ्या, बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्याना संधी देऊन स्वच्छ कारभाराचा नमुना पेश केला की काय, अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी जी आश्वासने सांगलीकरांना काँग्रेसने दिली होती त्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने काँग्रेस याच पद्धतीने वागणार काय, अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन काँग्रेसच्या धोरणावर आगपाखड करीत पराभवाला कारणीभूत ठरणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसने स्वीकृतीची  संधी देऊन कोणती तत्त्वनिष्ठा बाळगली, याचे उत्तर पक्ष नेतृत्वाने देणे गरजेचे आहे.
स्वीकृत सदस्य निवडीमध्ये महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या गटातटांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. विकास महाआघाडीच्या कारभाराविरुद्ध म्हणजेच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात आंदोलनाची धार कायम ठेवणाऱ्या मदन पाटील युवा मंचला सत्तेत वाटा मिळेल अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा फोल ठरताच बेरजेचे गणित घालणाऱ्या महापालिकेतील काँग्रेसचे राजकारण करणाऱ्या गटाला युवा मंचने राजीनामा देत या निवडी पशाच्या बळावर झाल्याच्या आरोप केला आहे. युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, आसिफ बावा,तानाजी सरगर आदींनी या निवडीला विरोध दर्शवित नाराजी व्यक्त करीत युवा मंचसह काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आहे.
दुसऱ्या बाजूला पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या गटाकडून प्रमोद सूर्यवंशी यांना स्वीकृतची संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. ती सुद्धा फोल ठरल्याने हा गटसुद्धा नाराजीच्या सुरात सूर मिसळून आगपाखड करीत आहे. काँग्रेसच्या ऐक्य एक्स्प्रेसला सत्ता मिळून एक महिना होण्यापूर्वीच नाराज गटानी लाल बावटा दाखविल्याने सांगलीचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे येणारा काळच दाखविणार आहे.