मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीसह सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा करणारे राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी सोलापुरात पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पवार व मेटे यांची बंद खोलीत चर्चा झाली. या भेटीत पवार यांनी मेटे यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.
सोलापूर लोकसभेसाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माढय़ासाठी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्यासाठी पवार हे काल सोमवारी रात्री मुक्कामाला आले होते. त्यांचा मुक्काम होटगी रस्त्यावरील बालाजी सरोवर पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. विजयसिंह मोहिते-पाटील व माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासोबत पवार यांचे हॉटेलमध्ये आगमन होताना विनायक मेटे यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर पवार व मेटे यांची एका बंद खोलीत गुफ्तगू झाली. या भेटीनंतर मेटे यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कशी राहणार आणि ते कशाप्रकारे मोर्चेबांधणी करणार, याकडे मराठा समाजासह ओबीसी वर्गाच्या नजरा वळल्या आहेत.