News Flash

साथीचे आजार बळावले

दररोज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बाह्य़रुग्ण विभागात सुमारे ४०० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.

दीड महिन्यांत ग्रामीण रुग्णालयात ४४० रुग्ण; हवामान बदलाचा परिणाम

हवामानात होत असलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाला असून गेल्या काही महिन्यांपासून पालघरमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. गेल्या दीड महिन्यात रुग्णालयात साथीच्या आजारांचे ४४० रुग्ण दाखल झाले आहेत.

हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे साथीचे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी अधिक रुग्ण साथीच्या आजारांचे आहेत. नोव्हेंबर महिन्यात साथींच्या आजाराने ४०० रुग्ण जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. १ ते ११ डिसेंबर या कालावधीत साथीच्या आजारांच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजे या कालावधीत ४० रुग्ण दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

दररोज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बाह्य़रुग्ण विभागात सुमारे ४०० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. यामध्ये बहुतांश रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे उपचारासाठी येत आहेत. दररोज ४० ते ५० रुग्ण साथीच्या आजारांचे उपचार घेण्यासाठी येत आहेत. सप्टेंबर महिन्यात ४५० रुग्ण साथीच्या आजारांच्या उपचारांसाठी आले होते. ऑक्टोबरमध्ये ५५० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. नोव्हेंबरमध्ये रुग्णांची हीच आकडेवारी ४०० होती, तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत ४० रुग्ण दाखल झाले आहेत.

डिसेंबर महिना असला तरी अद्याप थंडीला सुरुवात झालेली नाही.  रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. वाढलेल्या तापमानामुळे साथीचे आजार बळावत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

हवामानातील बदलामुळे साथीचे व संसर्गजन्य आजार वाढले आहेत. हे लक्षात घेता नागरिकांनी याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे. ग्रामीण रुग्णालयात साथीच्या आजारांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. – डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:28 am

Web Title: disease patient hospital admit change air akp 94
Next Stories
1 बोईसरच्या पादचारी पुलाची रखडपट्टी
2 वाडय़ात बीएसएनएलची सेवा पाच दिवसांपासून ठप्प
3 सरपटणारे प्राणी नागरी वस्तीत
Just Now!
X