कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर-सोलापूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी काही वेळ बंदही पाळला. पोलीस निरीक्षक पी. व्ही. इंगळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील माहीजळगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी असते. बुधवारी आज सकाळी नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिरातील दोन्ही मूर्तीची विटबंना करण्यात आल्याचे लक्षात आले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व गावात पसरली. या गोष्टीचा निषेध करून ग्रामस्थ तातडीने एकत्रित जमले. पोलीस निरीक्षक इंगळे, प्रभारी तहसीलदार जयसिंग भैसडे यांनीदेखील ग्रामस्थांच्या भावनांना सहमती दर्शवून संबंधित समाजकंटकांना अटक करू असे आश्वासन दिले. या वेळी या मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी या निषेध सभेतच घेतला. अनेकांनी लगेचच त्यासाठी देणग्याही जाहीर केल्या.