पूर्वी काँग्रेसने ज्याप्रमाणे ‘आघाडीचा धर्म’ पाळला त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही ‘आघाडीचा धर्म’ पाळावा, असा सल्ला माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दिला. नाराजांच्या बैठकीत त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारी चीड दिसून आल्याने अन्य वक्त्यांनीही मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याची टीका बैठकीत केली. चिंचोली येथे  झालेल्या या बैठकीस सूर्यकांता पाटील, शिवाजी माने, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारा हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने नेते एवढे नाराज होते की, आमदार राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजीराव माने व त्यांच्या समर्थकांनी दांडी मारली. मात्र,  किनवटचे आमदार प्रदीप नाईक व जयप्रकाश दांडेगावकर यांनी आघाडीचा धर्म पाळणार असल्याची भूमिका जाहीर सभेत मांडली होती. या पाश्र्वभूमीवर सूर्यकांता पाटील, शिवाजीराव माने व त्यांचे समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले होते. भाषणांमध्ये आघाडीचा धर्म पाळा, असे आज सांगितले गेले. तथापि, तो ‘धर्म’ कसा असावा, हेदेखील माजी खासदार यांनी सांगितले. ज्या व्यक्ती सातव यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत, ते मात्र नाराजांच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवून असल्याची चर्चा जिल्ह्य़ात रंगली आहे.