प्रशांत देशमुख

नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांसाठी केंद्राने आखलेल्या प्रशिक्षणास राज्यातून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. या प्रशिक्षणासाठीच्या नोंदणीत अव्वल असलेल्या कोल्हापूरसह पाचच जिल्हय़ांनी या प्रशिक्षणाला गांभीर्याने घेतल्याचे चित्र आहे.

मुख्याध्यापकांना नव्या शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडायची आहे. शाळेचे नेतृत्व करणारा हा घटक नव्या बदलांची योग्य अंमलबजावणी करण्यास समर्थ ठरावा म्हणून हे प्रशिक्षण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा) नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास केंद्राने यासाठी कार्यक्रम तयार केला. त्याची अंमलबजावणी औरंगाबादच्या महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा)द्वारे होत आहे. शालेय नेतृत्व विकास व्यवस्थापन अशा या कार्यक्रमाची सुरुवात ३ डिसेंबर २०२० ला झाली होती. देशभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणस्थळावरील शाळाप्रमुखांसाठी हा कार्यक्रम मोफत व ऑनलाइन आहे. दिल्लीच्या ‘निपा’तर्फे  नुकताच राज्यातील जिल्हानिहाय अहवाल तयार झालेला आहे.

या अहवालानुसार, प्रशिक्षणात स्वारस्य दाखवण्यात ९६५ मुख्याध्यापकांसह कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आहे. त्यापाठोपाठ सोलापूर ८६५, नागपूर ६८५, मुंबई उपनगर ६६७, जळगाव ६३९, सातारा ६०३ या जिल्ह्य़ांचा क्रम लागतो. नोंदणी करण्यात वर्धा सर्वात शेवटी असून वाशीम, अकोला, धुळे, गडचिरोली, लातूर, परभणी शंभरीही गाठू शकले नाहीत. नोंदणी करीत प्रशिक्षण आटोपणाऱ्या मुख्याध्यापकांची संख्या मुंबई उपनगर व पुणे जिल्हय़ात लक्षणीय आहे. भाषिक अडचण येऊ नये म्हणून मराठी भाषेत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा पहिला मान देशात महाराष्ट्रास लाभला.

मात्र ही सुविधा मिळूनही या मोलाच्या प्रशिक्षणात राज्यातील मुख्याध्यापक मागेच आहेत. हे प्रशिक्षण शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमावर आधारित व केवळ दोन महिन्यात पूर्ण होणारे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात शाळा परिसर, समाजाचा सहभाग, विविध उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढणार असल्याने प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याची भूमिका ‘निपा’तर्फे  मांडण्यात आली आहे.

मुख्याध्यापक संघटनेचे नेते सतीश जगताप म्हणाले,  मुख्याध्यापकांचा निरुत्साह चितेंची बाब आहे. संघटना पातळीवर प्रशिक्षणात अधिकाधिक नोंदणी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. प्रशिक्षणातून मुख्याध्यापकांमध्ये चांगले बदल निश्चितच घडून येतील. प्रशिक्षण गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

अधिकाधिक मुख्याध्यापकांना प्रशिक्षणात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न विविध माध्यमातून होत आहेत. राज्यातील काही जिल्हय़ात नोंदणी अल्प प्रमाणात झाली हे खरे आहे. शिक्षणाधिकारी, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था तसेच सर्वसंबंधितांना नोंदणी व प्रशिक्षणासाठी सूचना करण्यात आली आहे. बदल दिसेलच.

– डॉ. नेहा बेलसरे, संचालक, ‘मिपा’, औरंगाबाद.