‘ग्लोबल टीचर’ डिसले गुरुजींमुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या रणजीत सिंह डिसले यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे आणि रणजीत सिंह डिसले यांच्यात शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. रणजीत सिंह डिसले यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह राज ठाकरेंची भेट घेतली.

 

परतेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या रणजीत सिंह डिसले यांना ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आज त्यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनीही त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले.

रणजीतसिंह डिसले यांना सात कोटी रुपये बक्षीस मिळालं. मात्र ते मानधन त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दान केलं. याबाबत राज ठाकरे म्हणाले की “डिसले गुरुजींनी दाखवलेल्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली आहे” दरम्यान डिसले गुरुजी यांना राज ठाकरे यांची शिक्षण क्षेत्राबाबत असलेली आवड चांगली वाटली आहे. महाराष्ट्राचं नाव शिक्षण क्षेत्रात आणखी उंचावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचंही डिसले यांनी स्पष्ट केलं.