गोकुळ दूध संघाचा कारभार भ्रष्टचाराने माखला आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमावा, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. गोकुळने पशुखाद्याची असह्य दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जनावरांसह गोकुळ दूध संघाच्या येथील ताराबाई पार्कातील कार्यालयावर मोर्चा काढला. पशुखाद्याची दरवाढ मागे न घेतल्यास टप्प्या-टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता पशुखाद्याच्या पोत्यामागे १०० रुपये दरवाढ केली आहे. दूध उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला ही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे पशुखाद्याची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली जनावरांसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विजय देवणे यांनी गोकुळच्या मलईदार कारभारावर सडकून टीका केली. ते म्हणाले, गोकुळचे संचालक मंडळ मनमानी खर्च करत आहे. गोकुळला लुटण्याचा उद्योग सुरु आहे. शेतकऱ्यांना दूध दरवाढीचा लाभ न देता त्याची आर्थिक लूट चालवली आहे.

शेतकऱ्यांना अनुदान मिळू द्यायचे नाही आणि दुसरीकडे पशुखाद्याची असह्य दरवाढ करून त्याचे जगणे मुश्कील केले जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळला बहुराज्य दर्जा विरोध केला होता. त्यामुळे त्यांनी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळच्या देण्यास गैरकारभाराबाबतही लक्ष घालून भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करावे.

आपटेंचा निषेध, घाणेकरांवर टीकास्त्र

शिवसेनेने मोर्चा काढणार असल्याची पूर्वसूचना गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांना दिली होती. तरीही अनुपस्थित राहिल्याने शिवसैनिकांनी रवींद्र आपटे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तर, गोकुळच्या कारभाराविषयी आणि पशुखाद्य दरवाढबाबत शिवसैनिकांनी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. घाणेकर हे गुळमुळीत उत्तर देऊ लागल्याने त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आला.