सोलापूर महापालिकेचा कारभार चांगल्याप्रकारे चालवून काँग्रेस पक्षाची जनमानसातील प्रतिमा उज्ज्वल करावी. आपसात भांडणतंटे करीत बसाल तर पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी माझ्याकडे राजीनामे द्यावेत. मग आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महापालिका बरखास्त करायला लावतो, अशा खरमरीत शब्दांत पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षीय नगरसेवक व पालिका पदाधिका-यांची झाडाझडती घेतली.
सोलापूर महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस पक्षांतर्गत महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात नगरसेवकांमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या वेळी बहुसंख्य नगरसेवकांनी महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्यावर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला. नगरसेवक अनिल पल्ली यांनी आक्रमक पवित्रा घेत महापौर प्रा. आबुटे यांच्या विरोधात विविध आक्षेपार्ह असे १५ मुद्दे शिंदे यांच्यासमोर मांडले. या मुद्द्यांची गंभीर दखल घेत सुशीलकुमार शिंदे यांनी हे आक्षेपार्ह मुद्दे सर्व नगरसेवकांना मान्य आहेत का, अशी विचारणा करताच त्यावर वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्यामुळे शिंदे हे संतापले आणि थेट महापालिकाच बरखास्त करण्याचा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेस भवनातील या बैठकीतील वातावरण अधिकच गंभीर झाले. अर्थात, त्यामुळे नगरसेवकांनी मवाळ भूमिका घेत शिंदे यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. महापौर प्रा.सुशीला आबुटे यांनी आपला स्वभाव तथा अरेरावीची भाषा बदलून सर्वांना विश्वासात घेऊन पालिकेचा कारभार करावा, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकांना सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सामोरे जाण्याचा निर्धार बोलून दाखविला. शिंदे यांनीही सर्वाना खडेबोल सुनावत चांगला कारभार करता येत नसेल तर राजीनामे द्या, असे बजावले.