मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबजनक आरोपांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील अनिल देशमुख यांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून, राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

“महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचे पत्र आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात पाठविले आहे.” अशी माहिती ट्विटद्वारे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

याचबरोबर “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरा समोर स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरानंतर महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडी पाहता राज्यातील जनतेचा राज्य सरकार वर विश्वास राहिला नाही.कायदा आणि सुव्यवस्था राबविणारी यंत्रणा बिघडली आहे.राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्याने गृहविभाग कलंकित झाला आहे. तसेच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.” अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे.

तर, माजी पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहामंत्र्यांवरच केलेले गंभीर आरोप पाहता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नाही.त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचं काल आठवलेंनी सांगितलं होतं.

“माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे.त्यामुळे नैतिकेच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.” अशी मागणी देखील या अगोदरच रामदास आठवलेंनी केलेली आहे.

याशिवाय “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृह मंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही.” असं देखील आठवले म्हणालेले आहेत.

तसेच, “मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप गृहमंत्र्यांनी नाकारले आहेत.मात्र असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लौकीकावर कलंक लागला आहे. असंही केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी या अगोदर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.