शहराच्या जीवनरेखा बालगृहातील अनागोंदी माहितीच्या अधिकारातून अखेर चव्हाटय़ावर आली. कर्मचारी नसताना हजेरीपटावर बनावट सह्य़ा करून संस्थाचालकाने मानधनापोटी लाखो रुपये उचलल्याचे या निमित्ताने समोर आले. बालगृहातील अनाथ बालके उपाशी राहत असल्याने त्यांची अन्यत्र रवानगी करावी, अशी मागणी एचआयव्हीबाधीत मुलांसाठी काम करणारे डॉ. पवन चांडक यांनी केली.
शहरातील कडबी मंडी येथील नारी विकास महिला मंडळातर्फे हे बालगृह चालविले जाते. यात १३ एचआयव्ही बाधीत अनाथ बालके राहतात. बालकांना सरकारकडून अंत्योदय योजनेत दरमहा धान्य मिळते. त्यासोबत प्रत्येक मुलामागे १ हजार १४० रुपये रक्कम दिली जाते. परंतु संस्थाचालक जावेद फारुखी याने मुलांच्या नावावर धान्य उचलून परस्पर बाजारात विक्री करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे बालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बालगृहातील एका मुलीचा मृत्यू होऊन ४ महिने लोटले. परंतु तिच्या नावावर आजही धान्य उचलण्यात येते. बालगृहात सध्या एकही कर्मचारी नसताना कर्मचाऱ्यांच्या नावावर त्यांच्या वेतनाची रक्कम उचलण्यात आली. मुलांना स्वतच स्वयंपाक करावा लागतो.
बालगृहातील मुलांसाठी झटणारे डॉ. पवन चांडक यांनी सामाजिक बांधिलकीतून मागील ५ वर्षांपासून बालगृहास वेळोवेळी मदत केली. पोषण आहार ते विविध उपकरण उपलब्ध करण्यापर्यंत डॉ. चांडक यांचा हातभार राहिला. समाजापासून ही मुले दूर जाऊ नयेत, या साठी बालगृहात विविध उपक्रम घेणे, मुलांच्या सहली, विशेष शिबिरे, मुलांना योग्य पोषणआहार, यावर भर देत. डॉ. चांडक व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाखोची मदत बालगृहाला दिली. परंतु संस्थाचालकांनी ही मदत मुलांपर्यंत पोहोचू दिली नाही, असा आरोप डॉ. चांडक यांनी केला. उलट डॉ. चांडक यांनाच बालगृहाचे कर्मचारी दर्शवत हजेरीपटावर त्यांच्या बनावट सह्य़ा करून १ मार्च २०११ ते २ जुल २०१३ या काळात डॉ. चांडक यांच्या नावावर जावेद फारुखी याने १ लाख २८ हजार रुपये उचलले.
ही सर्व माहिती डॉ. चांडक यांनी माहिती अधिकारातून मिळवली. त्यांनी प्रत्यक्ष बालगृहात जाऊन पाहणी केली असता त्यांना अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. या सर्व प्रकारांबाबत डॉ. चांडक यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड, महिला व बालविकास आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे तक्रार केली. परंतु एकाही कार्यालयाकडून ठोस कारवाई झाली नाही. बालगृहातील मुलांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत असून या मुलांची रवानगी लातूरच्या बालगृहात करावी, अशी मागणी डॉ. चांडक यांनी केली.