News Flash

‘शिर्डी’वरून बौद्ध समाजात नाराजी

लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला डावलण्यात आल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेना व भाजपनेही डावलल्याने चर्चा करण्यासाठी नेवासे येथे परवा (शुक्रवार)

| March 26, 2014 12:47 pm

लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला डावलण्यात आल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेना व भाजपनेही डावलल्याने चर्चा करण्यासाठी नेवासे येथे परवा (शुक्रवार) रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांचा पराभव झाला. त्यानंतर आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली. राज्यात नवी राजकीय समीकरणे सुरू झाली. आठवले यांनी महायुतीशी समझोता केला. त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेवर पाठविण्यात आले. मात्र अजूनही बौद्ध समाजाला राजकारणात डावलले जात असल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने माजी मंत्री बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली होती. पण न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा सुनावली. त्यामुळे घोलप यांची उमेदवारी रद्द करावी लागली. रिपब्लिकन पक्षाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी खासदार आठवले यांची भेट घेतली. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाने अशोक गायकवाड किंवा प्रेमानंद रूपवते यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. या वेळी ठाकरे यांनी घोलप यांचा मुलगा किंवा मुलीला उमेदवारी दिली जाईल, पण त्यांना उमेदवारी दिली नाहीतर रिपब्लिकन पक्षाचे गायकवाड यांना उमेदवारी दिली जाईल असे आश्वासन दिले.
शिवसेनेने मंगळवारी माजी आमदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली. घोलप यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली, पण रिपब्लिकन पक्षालाही डावलण्यात आले. बौद्ध समाजाचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. युतीचे उमेदवार लोखंडे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागूल हे उपस्थित असले तरी प्रमुख कार्यकर्ते अनुपस्थित होते. पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, सुरेंद्र थोरात, भाऊसाहेब पगारे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते अनुपस्थित होते. त्यामुळे आता निवडणुकीत राजकीय भूमिका ठरविण्यासाठी शुक्रवारी नेवासे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2014 12:47 pm

Web Title: displeasure in buddhist community over shirdi 2
Next Stories
1 शिर्डीत शिवसेनेचाच विजय- लोखंडे
2 सोलापुरात शक्तिप्रदर्शन करीत शिंदे व मोहिते यांची उमेदवारी दाखल
3 मोदींच्या हाती सत्ता देणे चुकीचे- शरद पवार
Just Now!
X