केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूरकरांसाठी हैदराबाद, पणजी व जयपूरसाठी नवीन रेल्वेगाडय़ा मंजूर करण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अवघ्या ४५ किलोमीटर अंतराचा सोलापूर-तुळजापूर नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास मान्यता देऊन नाराज सोलापूरकरांची बोळवण करण्यात आली.
मध्य व पश्चिम विभागाला दक्षिणेकडे रेल्वेने जोडणारा विभाग म्हणून सोलापूरला महत्त्व आहे. परंतु रेल्वेच्या विकासात सोलापूरसाठी नेहमीच अन्याय होतो. केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अनेक विकास योजना रखडल्या आहेत. त्यांना खूपच संथ गतीने चालना मिळते. अलीकडेच सोलापूर विभागाचे विभाजन होऊन गुलबर्गा स्वतंत्र विभाग निर्माण झाल्याने सोलापूरवर अन्याय झाल्याची जखम ताजी असतानाच आता रेल्वे अर्थसंकल्पातही उपेक्षाच पदरी आल्याने सोलापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाल्याची प्रतिक्रिया सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत आहे.
यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार सर्वेक्षण होऊन हा नवीन मार्ग मंजूर होण्याची अपेक्षा होती. परंतु ती डावलण्यात आली. आता सोलापूर-तुळजापूर या केवळ ४५ किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय रेल्वे अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. केवळ सोलापूर-तुळजापूपर्यंत नव्हे तर सोलापूर-जळगाव असा लांब पल्ल्याचा नवीन रेल्वेमार्ग तयार व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी मागील दोन-तीन पिढय़ांपासून वेळोवेळी आंदोलनेही होत आहेत. जळगावपर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्याऐवजी जवळच्या तुळजापूपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाला मंजुरी देणे ही कुचेष्टा असल्याची भावना सोलापूर व मराठवाडय़ातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.