जुलै महिन्यांत सर्वाधिक कचरा
कल्पेश भोईर ,लोकसत्ता
वसई : करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात करोनाचा जैववैद्यकीय कचरा निघत होता. आता जरी त्याचे प्रमाण कमी झाले असले तरी वसई-विरार , पालघर , मीरा-भाईंदर या तिन्ही शहरांतून आतापर्यंत १ लाख १५ हजार १८५ किलो एवढय़ा करोनाच्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्याच्या अखेरपासून करोनाचे संकट सुरू झाले होते. वसई विरार , मीरा भाईंदर, पालघर या तिन्ही शहरांतील विविध ठिकाणच्या भागांतून करोनाचे रुग्ण आढळून येत होते. या करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी करोना केंद्रे उभारण्यात आली होती. परंतु करोनाचा कचरा हा घातक असल्याने त्याचे तातडीने गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. यामध्ये पीपीई किट, मुखपट्टी, बुटांची आच्छादने, रक्ताने दूषित वस्तू, कापूस, रक्ताच्या पिशव्या, सुया, सीरिंज यासह इतर साहित्य यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव अधिक होता त्यामुळे जैविक कचऱ्याचे प्रमाणही वाढले होते. एप्रिल २०२० ते १८ जाने २०२१ या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये वसई विरारमधून ४१ हजार ८३३ , मीरा भाईंदरमधून ६० हजार १७१ तर पालघरमधून १३ हजार १८१ अशा एकूण १ लाख १५ हजार १८५ किलो इतका जैववैद्यकीय कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी सांगितले आहे. यामध्ये जुलै महिन्यात तिन्ही शहरांतून सर्वाधिक म्हणजेच १९ हजार ४०७ किलो कचरा निघाला होता. मागील काही महिन्यांपासून या तिन्ही शहरांत आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कचऱ्यात घट झाली आहे. मध्यंतरी जुलै महिन्यात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत होती. त्यामुळे प्रतिदिन ६४६ किलो इतका कचरा निघत होता. परंतु नवीन वर्षांची सुरुवात होताच या कचऱ्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन आता १२९ किलो प्रतिदिन इतके आले आहे.
केंद्रांची संख्याही घटली
करोना रुग्णांवर उपचारासाठी उभाण्यात आलेली व अधिग्रहित केलेली करोना केंद्रे कमी होत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पालघर ११, वसई-विरार १६, मीरा-भाईंदर २३ अशा एकूण ५० केंद्रांतून कचरा घेतला जात होता. परंतु आता केंद्रांची संख्या कमी झाली असून सद्य:स्थितीत पालघर ७, वसई— विरार १० , मीरा भाईंदर ११ अशी केवळ २८ करोना केंद्र सुरू आहेत. शासकीय करोना केंद्रे सोडली तर बहुतेक खासगी करोना केंद्रे कमी झाली आहेत.
प्रतिदिन निघणारा सरासरी कचरा
महिना सरासरी प्रतिदिन
कचरा (किलोमध्ये)
एप्रिल १००
मे २०८
जून ५१३
जुलै ६४६
ऑगस्ट ६०५
सप्टेंबर ६१६
ऑक्टोबर ५६२
नोव्हेंबर २८९
डिसेंबर १९३
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2021 12:40 am