बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सरकारी नामुष्कीने दोषमुक्त ठरलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांनाही लाचलुचप्रतिबंधक न्यायालयातून मंगळवारी दिलासा मिळाला. कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांना मंगळवारी न्यायालयाने क्लीन चीट दिली. या खटल्यात कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही खटला दाखल होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काँग्रेस नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खटला सुरु होता. फेब्रवारीमध्ये या खटल्यात न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केले होते. कृपाशंकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्यावर आणि जनहित याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत ही मालमत्ता बेहिशेबी असल्याचा निष्कर्ष नोंदवत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच आर्थिक गुन्हे विभागाने २०१५ मध्ये कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात, फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांना दोषमुक्त केले होते. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक असते. ती घेतली न गेल्याने आरोपपत्र कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नव्हते, असे कृपाशंकर सिंह यांच्या वकिलांनी म्हटले होते.

कृपाशंकर सिंह दोषमुक्त झाले असले तरी त्यांच्या कुटुंबियांविरोधातील खटला सुरुच होता. या प्रकरणात मंगळवारी न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला आहे. न्यायालयाने सर्वांना बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यातून दोषमुक्त केल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.