News Flash

आश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी -विद्रोही

सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद चिघळला

सेवाग्राम आश्रम (संग्रहित छायाचित्र)

सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद चिघळला

वर्धा : आश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून चाललेली गुंडगिरी अशोभनीय असून याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असा इशारा सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिला. सेवाग्राम आश्रमासह अन्य गांधीवादी संस्थांचे संचालन करणाऱ्या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच चिघळत चालला आहे. या प्रकरणात महादेव विद्रोही व अविनाश काकडे यांनी परस्परांविरोधात सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दोन दिवसापूर्वी ऑनलाईन सभेत काहींनी विद्रोही यांना पदावरून बरखास्त करीत कार्यकारी अध्यक्षाची नेमणूक केली. या पार्श्वभूमीवर महादेव विद्रोही यांनी शनिवारी पत्रपरिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केले.

सरकारने बरबडी व अन्य भागातील काही जागा अधिग्रहित केली होती. त्याचा स्थानिक पातळीवर पाच लाख रुपयेच मोबदला मिळाल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा २१ कोटी ९० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश झाला. यावरच डोळा ठेवून काहींनी कारस्थाने सुरू केली. मला अध्यक्षपदावरून काढण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. अशी सभा घेणाऱ्यांना सभा बोलावण्याचा अधिकारच नाही. संस्थेच्या घटनेत विश्वस्तालाच सभा बोलविण्याचा अधिकार असून माझी मुदत पुढील निवडणुकीपर्यत आहे, असे ते म्हणाले.

सभा बोलवून नवीन पदाधिकारी निवडतानाच माझ्या कार्यालयाला, निवासाला कुलूप ठोकले. मला प्रवेश मिळू नये म्हणून दारू पिऊन माणसे बसविण्यात आली. या कार्यालयात माझे पैसे, विविध कागदपत्रे, सहय़ा केलेले धनादेश ठेवलेले आहेत. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून मी प्रथमच पोलिसांकडे गेलो. मारहाण करण्याचा माझा पिंड नाही. पैशातही मला स्वारस्य नाही. अविनाश काकडे यांनी चालविलेले प्रकार केवळ स्वार्थापोटी आहे. त्यांच्या भावाला व मित्र बारहाते यांना जागेवर कब्जा हवा आहे, असे आरोप विद्रोही यांनी केले.

आरोप काय? : मध्यंतरी खासदार रामदास तडस हे काही लोकांना सर्व सेवा संघाच्या मालकीची जागा भाडेपट्टय़ावर देण्याची विनंती करण्यासाठी मला भेटले. मात्र ही बाब धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारितील असल्याचे नमूद केल्यावर त्यांनी सर्व जागा काकडेंनाच देणार का, असा सवाल केला. व्यक्तीगत स्वार्थापोटी काकडे यांनी गुंडगिरी चालविली आहे. पोलीस अधीक्षकांनाही आपण अवगत केले आहे. पाच व सहा डिसेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्व सेवा संघाच्या अध्यक्षाची अधिकृत निवड होईल. तोपर्यत आपल्याकडेच पदभार असल्याचे विद्रोही यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:54 am

Web Title: dispute at sarva seva sangh vidrohi lodges police complaint zws 70
Next Stories
1 मानधन वाटपाचा नागपूर पॅटर्न राज्यभर लागू
2 महाराष्ट्रात आज २३ हजार ६४४ रुग्ण करोनामुक्त, आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज
3 “ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही”
Just Now!
X