अलिबाग येथील माणगाव तालुक्यात असलेल्या इंदापूरमध्ये निवडणूक निकालावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा आणि तुफान दगडफेक झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी वाद घालत दगडफेक करत होते. या प्रकरात सातजण जखमी झाल्याचीही माहिती समजते आहे. एक होमगार्ड आणि एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला मात्र या प्रकारामुळे निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे.

माणगावातील इंदापूर ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिलं होतं. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल नवगणे यांची मक्तेदारी मोडीत काढत राष्ट्रवादीचे दिनेश महाजन यांनी थेट सरपंचपदी विजय संपादन केला. हा निकाल शिवसेनेला धक्का देणारा ठरला. याच निकालावरुन शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये सायंकाळी जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूकडून तुफान दगडफेक करण्यात आली. शांतता व सुव्यवस्था धोक्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अखेर जमावाला पांगविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी काशिद यांच्या आदेशाने पोलिसांनी लाठीचार्ज केला.

या राड्यात 6 ते 7 कार्यकर्ते जखमी झाले. तर जमाव पांगवत असताना एक होमगार्ड आणि एक पोलीसही जखमी झाले. या घटनेमुळे इंदापूरमध्ये तणाव आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इंदापूरला पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते अशीही माहिती समजली आहे.