26 February 2021

News Flash

रायगडावरील रोषणाईवरून दोन खासदारांमध्येच वाद

खासदार संभाजी राजे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात वाद सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हर्षद कशाळकर

शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगडावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने आकर्षक रोषणाई केली होती. या रोषणाईवरून आता राजकारण सुरू झाले आहे. खासदार संभाजी राजे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात वाद सुरू आहे.

शिवजयंतीचे औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांनी किल्ले रायगडावर १८ आणि १९ फेब्रुवारीला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यासाठी त्यांनी पुरातत्त्व विभागाची परवानगी घेतली होती. या विद्युत रोषणाईची छायाचित्रे आणि चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. मात्र या रोषणाईवर खासदार संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला. ही रोषणाई विचित्र आहे. यामुळे पवित्र स्मारक डिस्को थेकप्रमाणे दिसत असून हा एक काळा दिवस असल्याची टीका त्यांनी केली. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर गोष्टी सकारात्मक दिसतात. मात्र नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर सगळ्या गोष्टी नकारात्मकच दिसतात. खासदार संभाजी राजे यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा काळा दिवस कसा असू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रायगडावर राजसरदरेवर साधी लाईटची व्यवस्था नव्हती. मेघडंबरीत काळोख होता. म्हणून राजांच्या रायगडावर काळोख नसावा या प्रामाणिक हेतूने आणि शुद्ध भावनेतून ही रोषणाई केली. यात राजकारण कुठेही नव्हते. सकारात्मक दृष्टीने इथे येऊन पाहणी केली असती, तर अशी टीका केली नसती असेही खासदार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. समाजमाध्यमांवर संभाजी राजे यांच्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

यानंतर खासदार संभाजी राजे यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. माझ्या वक्तव्यावरून शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मी टीका पुरातत्त्व विभागावर केली, श्रीकांत शिंदे यांच्यावर नाही. माझा आक्षेप ज्या पद्धतीने रोषणाई करण्यात आली, त्यावर आक्षेप होता. रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून एखादी गोष्ट चुकली तर त्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही का, रायगडवर चांगल्या सोयीसुविधा यासाठी मी आग्रही आहे.

गडावर मोठय़ा प्रमाणात कामे होत आहेत. यामागे राजकीय हेतू नाही. रायगडावर मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा यासाठी मी प्रयत्न केले, तेव्हा हे सर्व जण कुठे गेले होते. भावना चांगली आहे म्हणून कोणी काही पण करेल का असा सवाल संभाजी राजे यांनी उपस्थित केला.

रायगडावर चाललंय तरी काय?

काही दिवसांपूर्वी चित्त दरवाजाजवळ पुरातत्त्व विभागाने उभारलेले तिकीटघर संतप्त शिवभक्तांनी दरीत ढकलून दिले होते. आधी गडावर सोयीसुविधा द्या, मग तिकीट वसुली करा अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेना आमदार भरत गोगावले यावेळी उपस्थित होते. त्यानंतर गडावर सुरू असलेल्या प्री वेडिंग चित्रीकरणावरून गदारोळ झाला. दोन दिवसापूर्वी रायगडावर मद्य पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना शिवभक्तांनी चोप दिल्याची चित्रफीत समोर आली आणि आता शिवजयंतीच्या रोषणाईवरून वाद निर्माण झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:19 am

Web Title: dispute between two mps over lighting on raigad abn 97
Next Stories
1 पश्चिम विदर्भावर करोनाचा विळखा अधिकच घट्ट!
2 दिलासादायक – राज्यात आज ५ हजार ३५ जणांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ९४.९६ टक्के
3 “जनतेतील असंतोष अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येईल, या भीतीने लॉकडाउन, निर्बंध लादले जातायत का?”
Just Now!
X