चीनला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने बंदी घातलेल्या मोबाईल अॅपवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. डॉक्युमेंट स्कॅन करणारं चिनी अॅप ‘कॅम स्कॅनर’वरुन हा वाद सुरु झाला असून याचा वापर करणाऱ्या भाजपावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शरसंधान साधत भाजपाचा राष्ट्रवाद बेगडी असल्याचं म्हटलं होतं. त्याला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर खोटेपणाचा आरोप केला होता. त्यानंतर उपाध्येंच्या या आरोपाला सावंत यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.

केशव उपाध्ये यांना प्रत्युत्तर देताना सचिन सावंत यांनी ट्विट केलं आणि म्हणाले, “खोटेपणातून भाजपाचा बेगडी राष्ट्रवाद आणि गद्दारी समोर आली म्हणून आता भाजपाचा खोटेपणा अजून सुरूच आहे. पुरावा पाहिजे तर हा घ्या. भाजपाच्या फेसबुक अकाउंटवर अजूनही त्या प्रेसनोटमधील ‘कॅमस्कॅनर’ हा शब्द भाजपाच्या गद्दारीची साक्ष देत आहे.”

यापूर्वी सचिन सावंत यांनी पहिल्यांदा ट्विट करत भाजपाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची यादीची प्रत शेअर केली होती. या यादीची स्कॅन कॉपी ही मोदी सरकारने बंदी घातलेल्या चिनी ‘कॅम स्कॅनर’ या अॅपमध्ये स्कॅन केलेली होती. या अॅपचा लोगोही या स्कॅनकॉपीवर दिसत होता. ही कॉपी शेअर करताना सावंत यांनी म्हटलं होतं की, “जाहीर निषेध! गद्दार प्रदेश भाजपा मोदी सरकारने बंदी घातलेल्या कॅमस्कॅनर अॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चिनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपाचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे यातून स्पष्ट होते.”

सचिन सावंत यांच्या या टीकेवर भाजापाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केला होता. उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रक काढत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ” प्रदेश भाजपातर्फे २४ ऑगस्ट २०२० रोजी राज्यातल्या सर्व पत्रकारांना ओबीसी मोर्चा कार्यकारिणी यादीची पीडीएफ प्रत ई-मेलवरून पाठवण्यात आलेली आहे. ही प्रत तपासण्याची तसदीही न घेता अर्धवट माहितीच्या आधारावर सचिन सावंत यांनी भाजपावर आरोप केले आहेत. पत्रकार मंडळीही त्यांना मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकाची प्रत तपासू शकतात.”

“ज्या पक्षाच्या माजी अध्यक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणी खोटे आरोप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयापुढे माफी मागावी लागली होती, त्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्याने प्रसिद्धीसाठी असे खोटे बोलावे याचे नवल वाटत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या जो तमाशा चालू आहे, त्यामुळे या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे देशभर हसे होत आहे. त्यावरून लक्ष वळविण्यासाठी सावंत यांनी हा उद्योग केला असावा,” असेही उपाध्ये म्हणाले होते.