06 July 2020

News Flash

‘लाल बादशहा सांगणार अन् किलवर ऐकणार’

सत्तेत सहभागी असतानाही विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना नगरसेवकांवर विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप करतानाच, ‘चौकटीची राणी रुसली, लाल बादशहा सांगणार आणि किलवर गोटू ऐकणार’,

| December 20, 2014 01:59 am

सत्तेत सहभागी असतानाही विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना नगरसेवकांवर विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप करतानाच, ‘चौकटीची राणी रुसली, लाल बादशहा सांगणार आणि किलवर गोटू ऐकणार’, अशी मार्मिक टीका नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली, तर त्याच वेळी यातील चौकट राणी कोण, लाल बादशहा कोण आणि किलवर गोटू कोण, याचा शोध पत्रकारांनीच घ्यावा, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
रत्नागिरी नपमध्ये भाजप व शिवसेनेची मिलीजुली सत्ता आहे. भाजपचे महेंद्र मयेकर अध्यक्ष, तर शिवसेनेचे संजय साळवी उपनगराध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत युतीचे संसार मोडीत काढल्यानंतर त्याचे पडसाद रत्नागिरीतही उमटले. त्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आला. शिवसेनेचे साळवी उपनगराध्यक्षपदी निवडून आले, तर त्यांच्या विरोधक भाजपच्या प्रज्ञा भिडे पराभूत झाल्या आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासूनच रनप सभागृहात बहुमतात आणि सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात मोहीम उघडल्याचे दिसून आले. गत सप्ताहात (१२ डिसेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेतील गोंधळामुळे तर भाजप-शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे जगजाहीर झाले.
सभागृहात शिवसेनेचे बहुमत असतानाही या सभेत काही विषय जबरदस्तीने मंजूर करून नगराध्यक्षांनी मनमानी केल्याचा आरोप सेनेच्या नगरसेवकांनी करून त्या ठरावांना आमचा विरोध होता व आहे. त्यामुळे सदर सभेतील ठरावांना स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतची खरी वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी नगराध्यक्ष मयेकर यांनी पक्षकार परिषदेचे आयोजन केले होते. ते म्हणाले, काही जण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते, परंतु त्यांचा हिरमोड झाला. ते या ना त्या कारणामुळे विकासकामांना अडथळा आणू पाहात आहेत. शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला यांचा विरोध आहे. पदपथ मोकळे करण्याची मोहीमही यांना खटकते. शिवाजी स्टेडियममधील ‘चारापाणी’ बंद झाल्याने अनेकांची अडचण झाली आहे, असा आरोपही नगराध्यक्षांनी केला. शहराचा विकास व्हावा आणि तोही पारदर्शक असावा असा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्वसाधारण सभेच्या वेळी सभाशास्त्राचे उल्लंघन करून नगराध्यक्षांच्या आसनासमोर आरडाओरड करून सेनेच्या काही नगरसेवकांनी नागरिकांचाच अपमान केला आहे. त्यांचा खरा चेहरा नागरिकांना दिसलाच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी याची नोंद केली. सभेमध्ये जे जे विषय मंजूर झाले आहेत, त्याचप्रमाणे विकासकामे केली जातील, त्यामुळे नगराध्यक्षांची मनमानी चालली आहे, असे म्हणणे हास्यास्पद आणि खोडसाळपणाचे असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षांसाठी असलेल्या वाहनाला  ७ वर्षे झाली असून या कालावधीत त्याचे रनिंग १ लाख ३३ हजार कि.मी. एवढे झालेले आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर नवीन वाहन खरेदी केले जाणार आहे. तसेच क्रीडा स्पर्धा भरविण्यालाही या मंडळींचा विरोध आहे. वास्तविक यापूर्वीही अशा क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या असून, त्यांना नगराध्यक्ष क्रीडा स्पर्धा असेच म्हटले जाते. तसेच शहरातील एलईडी पथदीपाबाबतही कामाचे टेंडर काढावे, असे सर्वानुमते ठरलेले असतानाही याला ही मंडळी विरोध करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान या एकूण प्रकरणामागे बोलविता धनी हा दुसराच आहे. शिवसेनेत नव्यानेच आलेले, परंतु अद्याप सदस्यही झालेले नाहीत, तेच पाहुणे माझ्याविरोधात उडय़ा मारत आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी आसुरलेली मंडळी माझ्या विरोधात कारस्थान रचत आहेत. यामध्ये ‘चौकट राणीची भूमिका प्रमुख असून, लाल बादशहा सांगणार आणि किलवर गोटू ऐकणार’, अशा मार्मिक भाषेत नगराध्यक्ष मयेकर यांनी नपतील पडद्यामागच्या राजकारणाचा पर्दाफाश केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2014 1:59 am

Web Title: dispute in ratnagiri corporation
Next Stories
1 राज्यात मत्स्यबीजांचा प्रचंड तुटवडा
2 चंद्रपूर विस्तारित विद्युत प्रकल्पाचा २८ ला प्रारंभ
3 रोकडेश्वर सूतगिरणीला सील, ४०० कामगारांवर कुऱ्हाड
Just Now!
X