सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि वन विभाग या सरकारी कार्यालयांच्या नगर शहरातील सुमारे ११ एकर जागेवर खासगी व्यक्तीने केलेल्या घुसखोरीबद्दल सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. याबाबत शनिवारी सकाळीच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना दोन दिवसांत हे अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत शनिवारी ‘लोकसत्ता’त आलेल्या वृत्ताची पाटील यांनी गंभीर दखल घेतली.
नगर शहरातील औरंगाबाद रस्त्यावरील या तिन्ही कार्यालयांच्या जागेवर मालकी हक्क सांगणाऱ्या दोघांनी या जागेचा ताबाब घेतला असून, न्यायालयीन आदेशाचा आधार देऊन तसे फलकही गेल्या आठ-दहा महिन्यांपासून या विभागांच्या कार्यालयांसह या पूर्ण जागेवर लावले आहेत. याच परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा कार्यालयासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत प्रशासकीय इमारत बांधली आहे. पर्यावरणपूरक ‘ग्रीन’ संकल्पनेनुसार बांधण्यात आलेल्या इमारतीचाही ताबा या दोघांनी घेतला असून, या इमारतीत शुक्रवारी चक्क लग्नसोहळा झाला. त्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शनिवारी दिले होते. त्याची सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी गंभीर दखल घेतली.
पाटील हे शनिवारी जामखेडला आले होते. वाटेत जाताना काही वेळ ते कर्जतच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी ‘लोकसत्ता’चा अंक दाखवला असता ‘बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीत लग्नसोहळा!’ हे वृत्त वाचून पाटील अवाक झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता जे. बी. विभुते, कर्जतचे उपअभियंता सी. जी. येळाई, शाखा अभियंता एम. आर. बागूल येथे उपस्थित होते. पाटील यांनी लगेचच नागरगोजे यांच्याकडून या बेकायदेशीर अतिक्रमणाची माहिती घेतली. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन पोलीस बंदोबस्तात तातडीने हे अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला. लगेचच त्यांनी नगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याशीही संपर्क साधून या प्रकरणाविषयी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत पुरेसा पोलीस बंदोबस्त देऊन हे अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना पाटील यांनी त्रिपाठी यांनाही दिल्या. या इमारतीसह हा सर्व सरकारी परिसर अतिक्रमणातून मुक्त करून ही जागा प्रशासनाच्या ताब्यात द्या, असे पाटील यांनी सांगितले.
कर्जत येथे बेरड यांनी पाटील यांचे स्वागत केले. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ठोकरीकर, सचिन पारखी, शांतिलाल कोपनर, नगरचे तालुकाध्यक्ष शरद दळवी आदी या वेळी उपस्थित होते.
‘आम्ही नगरला येऊ का?’
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांच्याशी चर्चा करताना मंत्री पाटील यांनी मंगळवापर्यंतच हे अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. यात काही अडचण असेल तर मला सांगा. मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी येथे येऊन बसतो. या आवारात आम्ही बसून राहू, मग पाहू कोण आडवे येतो, अशा शब्दांत पाटील यांनी सुनावले.
तातडीने अहवाल मागवला
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाटील यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे. सोमवापर्यंतच हा अहवाल पाठवा आणि मंगळवारी हे अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करा, तसे मला कळवा, असे त्यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.