भारतीय वैद्यक परिषदेचा तीव्र आक्षेप

प्रशांत देशमुख, वर्धा</strong>

राज्यात प्रस्तावित आरोग्य वर्धिनी केंद्रात नऊ हजारांवर आयुर्वेद डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, परंतु भारतीय वैद्यक परिषदेने या निर्णयावर तीव्र शब्दात आक्षेप घेत या केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांचीच कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.  या नियुक्तीवरून दोन वैद्यकीय प्रणालींमध्ये जुंपल्याने शासन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातल्या १९ जिल्हय़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी नऊ हजारांवर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत असून अर्ज सादर करण्याची मुदत गुरुवारी संपली. आयुर्वेद शाखेच्या पदवीधरांना प्रथम सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर पात्रतेनुसार त्यांना २५ ते ४० हजार रुपये मानधनावर नियुक्त केले जाणार आहे. टप्प्याटप्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर अशा केंद्रात करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा प्रकारच्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात. नव्याने स्थापित केंद्रातून मानसिक आरोग्यासह विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत, परंतु भारतीय वैद्यक (आयएमए) संघटनेने हा जनतेच्या आरोग्याशी खेळ ठरेल, अशी भीती व्यक्त करीत आधुनिक औषधोपचार करण्याची परवानगी आयुर्वेद डॉक्टरांना देण्याची बाब बेजबाबदारपणाची ठरेल, याकडे लक्ष वेधले आहे.

बाल आरोग्य, लसीकरण अशा स्वरूपात सेवा देणारे केंद्र विशिष्ट विषयाचे अर्धवट ज्ञान असणाऱ्यांच्या हाती सोपवू नये, असे भारतीय वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शांतनू सेन (दिल्ली) यांनी सुचवले आहे. राज्य शासनाने हा बोगस प्रकार थांबवावा. या केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांचीच कायमस्वरूपी नियुक्ती करावी, असे आवाहन करतानाच डॉ. सेन यांनी हा गैरप्रकार थांबवण्यासाठी वैद्यक परिषद शेवटपर्यंत लढा देईल, असा इशारा दिला आहे.

‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ  इंडियन मेडिसिन’ने मात्र आयुर्वेद डॉक्टरांना बोगस संबोधण्याचा उद्दामपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  आयुर्वेद हा प्राचीन व आधुनिक अशा दोन्ही शाखांचा मिश्र अभ्यासक्रम असून त्यास केंद्राच्या मान्यतेसह सर्वोच्च न्यायालयाचीही परवानगी आहे. अशी मिश्र चिकित्सा पद्धती अंमलात यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले असताना त्याकडे वैद्यक परिषद  कानाडोळा करीत असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.