एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड असलेल्या सोलापूर ग्रामीणमध्ये पक्षांतर्गत वाटमारीचे व द्वेषमूलक राजकारण सुरूच राहिल्याने पक्षाची ताकद घटत चालली असतानाच, त्यात पक्षाचे अजितनिष्ठ जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला उद्देशून शिव्यांची लाखोली वाहिल्याची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांवर फिरू लागल्याने पक्षाची प्रतिमा रसातळाला गेली आहे. या प्रकरणाला अजित पवार – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातील शह-प्रतिशहाच्या राजकारणाचा काठ असल्याचे दिसून येते. साळुंखे हे ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेत सारवासारव करीत आहेत.

गेल्या १९ ऑक्टोबर रोजी साळुंखे यांनी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याशी भ्रमणध्वनीवर बोलताना त्यांच्या आवाजातील ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आणि पक्षाच्या वर्तुळात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीच्या हालचाली सुरू असताना अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिनाथ करपे यांना पदावरून दूर करून दुसऱ्याच व्यक्तीची वर्णी लावण्याची चर्चा सुरू झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील पक्षाच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. तालुकाध्यक्ष बदलू नये, अन्यथा तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी स्वत:हून राजीनामे देतील, अशी चर्चा सुरू होती. ही बाब अक्कलकोट राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या कानावर घातली होती. त्या वेळी दोघांत भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणात साळुंखे यांनी अक्कलकोटच्या महिला अध्यक्षाला उद्देशून शिव्यांची लाखोली वाहिल्याची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांसमोर आली. या कथित ध्वनिफितीमध्ये साळुंखे यांच्या आवाजात अक्कलकोट तालुकाध्यक्ष करपे व मोहिते-पाटील यांच्या नावाचाही ‘उद्धार’ करण्यात आला आहे. तेव्हा ही ध्वनिफीत प्रसारित होताच त्याबाबत क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या. साळुंखे यांच्या विरोधात अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुरेखा पाटील व तालुकाध्यक्ष मल्लिनाथ करपे यांनी सोलापुरात एका पत्रकार परिषदेत कारवाईची मागणी केली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून एकीकडे महिलांचा सन्मान करण्याची व महिला सबलीकरणासाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडून महिलांचा अवमान होतो, ही बाब गंभीर असून त्याची दखल घेऊन शरद पवार यांनीच न्याय द्यावा, अशी सुरेखा पाटील यांची मागणी होती.

दीपक साळुंखे यांनी आपल्यावरील आरोपाचे खंडन केले. अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांचा आपणांस भ्रमणध्वनीद्वारे संपर्क झाला होता. त्या वेळी त्यांनी अक्कलकोटच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालीविषयी माहिती पुरविली होती. परंतु या संभाषणात आपण कोणालाही शिवीगाळ केली नाही. मोहिते-पाटील यांच्याविषयीही काहीही आक्षेपार्ह विधान केले नाही. आपण माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याने आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून कोणी तरी जाणीवपूर्वक आपल्या हुबेहूब आवाजात शिवीगाळ केली व तो आवाज आपल्या आवाजात मिसळून ध्वनिफीत तयार केली व खोटेपणाने समाजमाध्यमांवर प्रसारित केली, असा दावा साळुंखे यांनी केला होता. दुसरीकडे साळुंखे यांच्याशी भ्रमणध्वनीवर ज्यांनी संपर्क साधला होता, ते मोतीराम चव्हाण हे कथित ध्वनिफीत प्रकरण गाजू लागताच बेपत्ता झाले. शेवटी दीपक साळुंखे व पक्षाचे अजितनिष्ठ सरचिटणीस उमेश पाटील यांच्या समवेत हेच चव्हाण पंढरपुरात प्रसार माध्यमांना सामोरे गेले. या प्रकरणात दीपक साळुंखे यांना निर्दोषत्वाचा दाखला देताना चव्हाण यांनी विसंगत माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ कायम राहिले आहे.

पक्षाकडून दखल

* पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या कथित ध्वनिफीत प्रकरणाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे सांगत याप्रकरणी साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे निवेदन केले होते. मात्र ही नोटीस मिळालेली नाही, असा साळुंखे यांचा दावा आहे. त्याच वेळी हे प्रकरण आता आपल्यासाठी संपल्याचेही ते आवर्जून सांगतात. कथित ध्वनिफितीची शास्त्रीय पद्धतीने व कायदेशीर शहानिशा न होताच हा विषय आपल्यासाठी संपला, असे स्पष्ट करताना साळुंखे यांची घाई झालेली दिसून येते.

* हे प्रकरण चव्हाटय़ावर येताच बेपत्ता झालेले मोतीराम चव्हाण यांचा भ्रमणध्वनी त्यांच्या हातातून निसटून पडतो आणि नष्ट होतो, अखेर पाचव्या दिवशी ते साळुंखे यांनाच गवसल्यानंतर त्यांचे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांसमोर देण्यासाठी साळुंखे यांनी पक्षाच्या जिल्ह्य़ाचे मुख्यालय न निवडता पंढरपूरचे ठिकाण ‘सुरक्षित’ म्हणून निवडले काय, याविषयी प्रश्नार्थक चर्चा आहे.

* संबंधित ध्वनिफितीचा खराखोटेपणा सिद्ध करायचा तर त्यासाठी शास्त्रीय आधार लागतो. फॉरेन्सिक सायन्स विभागाकडून साळुंखे व चव्हाण या दोघांच्या आवाजांचे नमुने घेऊन ते ध्वनिफितीतील कथित संभाषणातील आवाजाशी साम्य आहेत की नाही, याची शहानिशा करावी लागणार आहे. त्यासाठी हे प्रकरण पक्षीय पातळीवर खुलासे वा निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र न देता पोलीस तपासण यंत्रणेकडेच सोपवावे लागणार आहे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. साळुंके व चव्हाण यांनी तशी तयारी दर्शविली तरी दुसरीकडे हे प्रकरण आता आपल्यासाठी संपले आहे, असे सांगून त्यावर पडदा टाकण्याची घाई चालविल्याचे दिसते.

* माढा लोकसभेसाठी उमेदवारीचा दावा करताना अजितनिष्ठ दीपक साळुंखे यांनी मोहिते-पाटील यांच्याशी उघड उघड सवतासुभा मांडला होताच. भ्रमणध्वनीवरील संभाषण हे हिमनगाचे टोक आहे. त्याचा पाया मोहिते-पाटील विरुद्ध अजित पवार गटाच्या द्वेषमूलक आणि सतत शह-काटशह करणाऱ्या वृत्तीत आहे, हे राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांलाही माहीत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत मोहिते-पाटील यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्य़ात पर्यायी गट बांधण्याचे काम अजित पवार यांनी नेहमीच केले आहे. त्याची सूत्रे यापूर्वी माढय़ाचे शिंदे बंधूंकडे होती. ती आता दीपक साळुंखे यांच्याकडे असल्याचे मानले जाते.