प्रबोध देशपांडे

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला. यासाठी पशुसंवर्धन विभागाने हास्यास्पद कारण दिले आहे. अकोल्यामध्येच पशुधन मंडळाचे सक्षमीकरण करणे अपेक्षित असताना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगळीच भूमिका मांडली. अकोल्यात बैठकांसाठी उपस्थित राहणे गैरसोयीचे ठरत होते, असा अजब तर्क लावण्यात आला. या निर्णयामुळे पश्चिम विदर्भात तीव्र नाराजी असून विरोध होत आहे. हा निर्णय राजकीय दबावातून की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सोयी-सुविधांसाठी घेतला यावरून चर्चा सुरूआहे.

राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या कार्यकाळात मंडळाचे मुख्यालय अकोल्यात सुरू करण्यात आले. गत १८ वर्षांपासून मंडळाचे मुख्यालय येथे कार्यरत होते. ५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार हे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले.

स्थलांतरासाठी कारणे..

स्थलांतरासाठी दिलेली कारणे तथ्यहीन असल्याचा आरोप होत आहे. अकोल्यात महाराष्ट्र राज्य पशुधन विकास मंडळाच्या मुख्यालयासाठी स्वत:ची इमारत नाही. तसेच इमारत बांधकामासाठी मंडळाची स्वत:ची जमीन उपलब्ध नाही. केंद्र शासनाचे प्रतिनिधी, मंडळाचे अध्यक्ष, आयुक्त पशुसंवर्धन तसेच संचालक मंडळातील इतर सदस्यांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे आयोजित बैठकांना उपस्थित राहणे गैरसोयीचे होते, असे विचित्र कारणे देऊन स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला. नागपूर हे उपराजधानीचे देशातील मध्यवर्ती शहर असून दिल्ली, मुंबई, पुणे आदी शहरांतून नागपूरसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे हे मंडळ नागपूर येथील जुने वळू संगोपन केंद्र येथे स्थलांतरित करण्यात आले. मुख्यालयासाठी सर्व सुविधांची गरज आहे का? व मुख्यालय राजधानी किंवा उपराजधानीमध्ये असावे असा निकष असल्यास सर्वच विभागांचे मुख्य कार्यालय मुंबई आणि नागपूरमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, अशी संतप्त भावना अकोला जिल्हय़ातून व्यक्त होत आहे.

अकोल्यात १८ वर्षांपूर्वी स्थापन झालेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय कायम दुर्लक्षित राहिले. आयुक्त मुख्यालयी कधीच राहिले नसून पुण्यावरून या मुख्यालयाचा कारभार हाकण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त होती. पावणेदोन दशकांचा कालावधी लोटला तरी या कार्यालयासाठी इमारत उभारण्यात आली नाही. मंडळाचे मुख्यालय अकोल्यात असणे हे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच खुपत होते. त्यामुळे मुख्यालय अकोल्यातून इतरत्र हलविण्याचा डाव अनेक वेळा रचण्यात आला. मात्र, तो प्रयत्न वारंवार हाणून पाडण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी हा मुद्दा लावून धरत स्थलांतरणाला विरोध केला होता. मुख्यालयावर अनेकांचा डोळा असल्याने गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा स्थलांतरणाच्या हालचाली सुरू झाल्या. हे लक्षात घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन स्थलांतरण करू नये, अशी मागणी केली. त्यांनी मुख्यालय कायम राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मुख्यालयाच्या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीतून आर्थिक तरतूदही करण्यात आली. मात्र, याला कुठलीही दाद न देता अखेर हे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे नागपूरचे असल्याने त्या ठिकाणी मुख्यालय पळविण्यात आल्याचा आरोप होत आहे. या निर्णयामुळे अकोल्यासह पश्चिम विदर्भात सरकारविरोधात रोष निर्माण झाला.

मुख्यालय अकोल्यातच आवश्यक

पश्चिम विदर्भाचा अनुशेष व आर्थिक मागासलेपण लक्षात घेता पशुधन मंडळाचे मुख्यालय अकोल्यातच आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या ठिकाणी कृषी विद्यापीठ तसेच पशुवैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय आहे. शेतकऱ्यांना कृषी आणि पशुधनविषयक सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. मात्र, राज्य सरकारने स्थलांतरणापूर्वी हा दृष्टिकोन समोर न ठेवता राजकीय दबावातून सोयीस्कर ठिकाण निवडले. नागपूर मुख्यालयी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद ही शिखर संस्था, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पशुवैद्यकीय महाविद्यालय असताना या मुख्यालयाची गरजच नव्हती.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. या संदर्भात मुंबई येथे जाऊन संबंधितांकडे विचारणा करणार आहे. मुख्यालय अकोल्यात कायम राहण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.

– गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था