दिगंबर शिंदे

हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या संभाजी भिडे यांनी स्थापन केलेल्या  शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना पदावरून निलंबित करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर झळकली आणि अभेद्य गडकोटांनी बंदिस्त असलेल्या शिवप्रतिष्ठानच्या गडामध्येही खळखळ असल्याचे पहिल्यांदाच समोर आले. गेली सहा महिने सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदानंतर ही कारवाई झाली असली तरी यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संघटनेच्या अभेद्य तटबंदीआडची खळखळ फुटीच्या उंबरठय़ावर पोहचली असल्याचे यावरून दिसून येते.

chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

तरुणांचा सहभाग

प्रखर राष्ट्रवाद जोपासत, छत्रपती शिवरायांचा आदर्श मानत असलेल्या या संघटनेचे नाव अर्थाने राज्यभर झाले ते भीमा-कोरेगाव दंगलीनंतर. मात्र तत्पूर्वी या संघटनेची पाळेमुळे पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, बेळगाव आदी जिल्ह्य़ांत पसरली आहेत. ही संघटना गेली तीन दशके कार्यरत आहे. भिडे गुरुजींची ओघवती वाणी आणि रामायण, महाभारतातील दाखले देत शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांना संघटित करण्याचे काम केले जाते. यासाठी दसऱ्याच्यावेळी निघणारी दुर्गामाता दौड असो व गडकोट मोहीम असो यासाठी तरुण वर्ग मोठय़ा हिरिरीने सहभागी होतात. आज अनेक ठिकाणी दुर्गामाता दौडीची प्रथा सुरू झाली आहे यामागे शिवप्रतिष्ठानचा विचार आणि आचार आहे. भगवा ध्वज घेऊन धारकऱ्यांसोबत निघणारी ही दौड सूर्योदयाच्या सुमारास काढण्यात येते. यामध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांनी व्यसनापासून दूर राहण्याची अट असते.

या संघटनेने धारकरी आणि वारकरी यांना एकत्र आणण्यासाठी शक्ती आणि भक्ती हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी पुण्याची पुण्यभूमी निवडली आहे. यात अद्याप म्हणावे तसे यश आले नसले तरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रखर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यवाह म्हणून गेली २० वर्षे कार्यरत असलेले आणि संस्थापक भिडे गुरुजी यांच्या अत्यंत निकटचे म्हणून ओळखले जाणारे नितीन चौगुले यांना कार्यवाह पदावरून दूर करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी समाजमाध्यमातून केली. चौगुले यांची गच्छंती करण्यासाठी संघटनेला समाजमाध्यमांचा आधार का घ्यावा लागला हे कळायला मार्ग नाही. गुरुजींच्या एका शब्दाखातर क्षणात तरुणांचे मोहोळ गोळा करण्याची ताकद असताना चौगुले यांच्या हकालपट्टीसाठी ध्वनिचित्रफितीचा आश्रय का घ्यावा लागला हे कळायला मार्ग नाही.

गेल्या आठवडय़ामध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शार्जिल उस्मानीने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने आणि पुतळा जाळण्याचे आंदोलन सांगलीत करण्यात आले.

संघटनेला बदनाम करण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप करीत कारवाई करण्याची आग्रही मागणी संघटनेची आहे. या आंदोलनालाच संघटनेतील काही मंडळींचा विरोध होता का, असा प्रश्न चौगुले यांना पडला आहे. संघटनेच्या मोजक्या कार्यकर्त्यांची होणारी बैठकही बंदिस्तच असते. या बैठकीत पुढील धोरण निश्चित करण्यात येत असते. कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम या बैठकीतून होत असते. मात्र गेल्या सहा महिन्यांत झालेल्या बैठकीमध्ये वादावादीचे काही प्रसंग घडल्याचे सांगण्यात येते. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीही सांगण्यास सध्या तरी राजी नाही.

वादातून मार्ग निघणार?

शिवप्रतिष्ठानमध्ये सर्व काही आलबेल राहिलेले नाही हे यावरून स्पष्ट होत आहे. खुद्द चौगुले यांनाही ही माहिती समाजमाध्यमातूनच कळाली. त्यांनी २०० ते २५० कार्यकर्त्यांसह तात्काळ शिरोळमध्ये जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष देसाई यांना याचा जाब विचारत यामागील कारण सांगण्याचा आग्रह धरला आहे. यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र संघटनेतील हा वाद यदा कदाचित आपसातील चर्चेतून सोडविला गेला तरी मतभेदांची दरी सांधली जाणार का? हा प्रश्न कायम राहणार आहे.

शिवप्रतिष्ठान ही संघटना पूर्णपणे अराजकीय असल्याचे सांगितले जात असले तरी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत या संघटनेचा आदेशही घेतला जात असल्याची चर्चा आहे. भविष्यात ही संघटना अराजकीय स्वरूपाची ठेवणे आव्हानात्मक तर राहणार आहेच, पण संघटनेअंतर्गत निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणात ही संघटना भविष्यात पुन्हा उभारी कशी घेते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यामागील कारण कळावे एवढीच मागणी राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्याकडे केली आहे. दोन दिवसांत याचे उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतरच राज्यभर असलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र भगवा ध्वज आणि शिवछत्रपती हेच आमचे आराध्य आहे आणि तेच पुढेही कायम राहील.

– नितीन चौगुले