01 October 2020

News Flash

जिल्हा परिषदेमधील वाद विकोपाला

नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढ

संग्रहित छायाचित्र

नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढ

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्हा परिषदेची नवीन कार्यकारिणी कार्यरत होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे तसेच जिल्हा परिषद सदस्यांतर्फे मांडण्यात येणाऱ्या समस्या सुटण्याऐवजी त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे. विविध विषयांमध्ये परस्परांमधील संवादाचा व समन्वयाचा अभाव असल्याने जिल्ह्याचा विकास खोळंबला आहे.   विविध प्रकरणांतील चौकशीच्या फेऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सध्या अडकल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या, आढावा बैठकीच्या आरंभीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी तक्रारीचा सूर लावला. शिक्षकांची बदली व कार्य मुक्त केल्याचा विषय तसेच नव्याने झालेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या विषयासह इतर अनेक विषयांवर वाद सुरूच राहिली. हा वाद विकोपाला गेला असता उपाध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रजेवर जाण्याचा थेट सल्ला दिला तर एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या  संपत्तीची चौकशी करण्याची मागणी व भ्रष्टचाराचे आरोप केले. विशेष म्हणजे असे होत असताना अध्यक्षांनी सर्व काही शांतपणे ऐकण्याचा पवित्रा घेतल्याने विषय समिती सभापती व सदस्यदेखील अवाक झाले.

परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरीसुद्धा सध्या सेनेच्या नेतृत्वाचा प्रभाव कमी पडत असल्याने परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे. यापूर्वीच्या कार्यकारिणीच्या काळात घडलेल्या विषयांवर, सध्याच्या शिक्षण व इतर समितीमध्ये झालेल्या विषयी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडून अधिकारी वर्गावर थेट आरोप होऊन चौकशी करण्याची मागणी  केली जात आहे.

नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीची, त्यांच्या अधिकारांची तसेच विविध कामे जिल्हा परिषदेच्या साच्यामध्ये बसून घेण्याची पद्धत व्यवस्थितपणे अवगत झाली नसल्याने या समस्या निर्माण होत असल्याचे प्रथमत: निदर्शनास येते. त्याशिवाय पक्षांमधील नेत्यांमध्ये त्याचप्रमाणे अधिकारी वर्गामध्ये सुसंवाद व समन्वय नसल्यामुळे बैठका वादळी होत असल्या तरी त्यामधून फलित निष्पन्न होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न कसे सुटणार असा सवाल काही सदस्यांनी व्यक्त केला आहे. विकोपाला गेलेल्या वादळामुळे जिल्ह्याचे नुकसान होत असून जिल्हा परिषदेच्या विकासगाडय़ाची दोन चाके वेगवेगळ्या दिशेने व गतीने कार्यरत असल्याप्रमाणे दिसून येत आहे. गेल्या कार्यकारणीप्रमाणे यंदादेखील सर्व प्रमुख पक्ष एकत्रित सत्तेमध्ये सहभागी झाल्याने विरोधक नाममात्र संख्येत आहेत. अशा परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याऐवजी परस्परांमधील हेवेदावे व अधिकारी वर्गाविषयी असलेला पूर्वग्रह जिल्हा परिषदेच्या कामकाजातून दिसून येत असल्यामुळे सर्व संबंधितांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे अनेक जिल्हा परिषद सदस्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीसंदर्भात उपाध्यक्षांनी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडली व त्यांनी अधिकारी वर्गाच्या विरुद्ध सभेमध्ये काही वक्तव्य केली हे खरे आहे जर बदली प्रक्रियेत काही शंका असल्यास उपाध्यक्ष यांनी संबंधित विभागाकडे दाद मागणे अपेक्षित आहे. सध्या अनेक प्रकरणांच्या चौकशा सुरू असून अधिकारी-पदाधिकारी यांच्यामधील तणाव कमी करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

– भारती कामडी, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 1:11 am

Web Title: disputes in zilla parishad increasing problems of the citizens zws 70
Next Stories
1 इंटरनेट नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित
2 रत्नागिरी जिल्ह्य़ातील इंटरनेट दोन दिवसांत सुरळीत करा
3 रत्नागिरीत विनापरवाना प्रवेश नाही
Just Now!
X